चंदगड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासह चंदगड तालुक्यात लॉकडाऊन आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर चंदगड पोलिसांनी १२५ वाहनधारकांचे व विनामास्क फिरणाऱ्या ११४ जणांवर कारवाई करून वाहने जप्त केली. तसेच ३० हजार रुपयांचा दंड वसूल केला.
जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या आदेशान्वये १६ ते १८ मे २०२१ या कालावधीत चंदगड तालुक्यात अत्यावश्यक वाहने वगळता इतर कोणत्याही वाहनांना फिरण्यास बंदी आहे. या नियमांचा भंग करणारे नागरिक व वाहनांवर चंदगड पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए. तळेकर यांनी दिली.
लॉकडाऊन काळात अत्यावश्यक वैद्यकीय कारणाशिवाय नागरिकांनी बाहेर पडू नये. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व वाहने जप्त करून गुन्हे दाखल केले जात आहेत. जप्त केलेली वाहने बुधवारी (२ जून) संबंधित गाडीमालकांना परत करणार असल्याचे पोलीस निरीक्षक तळेकर यांनी सांगितले.
----------------------
फोटो ओळी : पाटणे फाटा (ता. गडहिंग्लज) येथे वाहनांची कसून चौकशी करताना चंदगडचे पोलीस.
क्रमांक : १८०५२०२१-गड-०७