पोपट पवार कोल्हापूर : शहरात दोनशे तीनशे फुटांवर तर ग्रामीण भागात एक-दीड किलोमीटरवर पेट्रोलपंप असताना आता केंद्र सरकारने महाराष्ट्रात १६६० नवीन पेट्रोल-डिझेल पंपांना मान्यता दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नव्या पंपांमुळे राज्यात ३० हजारांपेक्षा जास्त रोजगार मिळेल, असा दावा राज्य सरकार करत असले तरी मुळात आहेत ते पेट्रोल पंप गिऱ्हाईक नसल्याने बंद पडत आहेत, काही बंदही पडले आहेत. असे असताना सरकार नव्या पंपांना मान्यता देऊन आताच्या पंपमालकांना बेरोजगारीच्या खाईत तर ढकलत नाही ना, असा सवाल पेट्रोलपंपचालकांमधून उपस्थित केला जात आहे.कोल्हापूर जिल्ह्यात २८० पेक्षा अधिक पंप आहेत. केंद्रांची मंजुरी मिळाल्याने आता नव्याने जवळपास ४० हून अधिक पंप जिल्ह्यात होतील. म्हणजे ही संख्या तीनशेच्या वर जाणार आहे. सध्या जिल्ह्यातील ६० टक्के पंप तोट्यात आहेत. असे असताना पुन्हा नव्याने पंप झाले तर सगळ्यांच्याच व्यवसायावर परिणाम होणार आहे. सध्या इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर आल्याने पेट्रोल-डिझेलचा वापर कमी झाला आहे. या वाहनांचा वाढता वापर पेट्रोलपंपचालकांच्या मुळावर आला आहे.खर्च वाढतोय, गिऱ्हाईकांची संख्या होतेय कमीजिल्ह्यात रोज साडेतीन लाख लीटर पेट्रोल तर चार लाखांपेक्षा अधिक लीटर डिझेलची विक्री होते. याचे कमिशन लीटरला दहापैसे, वीस पैसे असे असते. सध्या सरकारने पेट्रोलपंपांना काही अटी व नियम घालून दिले आहेत. त्यानुसार सुविधा देणे बंधनकारक केले आहे. याचा सारा खर्च पंपचालकालाच करावा लागतो. त्यामुळे दिवसेंदिवस खर्च वाढत असताना गिऱ्हाईकांची संख्या मात्र कमी होत आहे. परिणामी, पंपचालकांना पंप चालवणे अवघड होऊन बसले आहे.
अंतरावरची अट शिथिल केल्याने व्यवसायावर परिणामएक पंप नव्याने उभारायचे म्हंटले तरी ६० ते ७० लाख रुपये खर्च येतो. शासनाच्या विविध परवानग्यांसाठी वेगळे पैसे मोजावे लागतात. पूर्वी एका पंपापासून दुसरा पंप किती अंतरावर असावा याचे नियम हाेते. त्यामुळे वीस वीस किलोमीटरवर एकाच पंपाला मान्यता मिळायची. त्यामुळे त्याचा व्यवसायही जोरदार चालायचा. सध्या ही अंतरावरची अटच शिथिल केल्याने फुटा फुटांवर पंप आहेत. त्यामुळे दोघांचाही व्यवसाय व्यवस्थित होत नसल्याचे चित्र आहे.कागल-वाठार मार्गावरील २० पंप तोट्यातपुणे-बंगळुरू महामार्गावरील कागल ते वाठार या मार्गावर ३० पंप आहेत. यातील २० पंप तोट्यात असल्याचा दावा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केला. पुढे कर्नाटकात महाराष्ट्रापेक्षा पेट्रेल-डिझेल स्वस्तात मिळते. त्यामुळे या पंपांवर महामार्गावरील वाहने थांबत नसल्याचे चित्र आहे.वाहनांची संख्या अशी
- दुचाकी : ११,९८,५१०
- चारचाकी : ३,२०,४१५
- अवजड वाहने : १,३००००
राज्यात १६६० पेट्रोलपंप नव्याने होत असले तरी इलेक्ट्रिक वाहनांमुळे आताच्या पेट्रोल-डिझेल पंपांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. काही पंप बंद पडले आहेत. त्यामुळे नवीन पंपांना मंजुरी जुन्या पंपांना अडचणी निर्माण करणारी ठरू शकते. -अरविंद तराळ, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा पेट्रोल-डिझेल असोसिएशन.