कोल्हापूर : जमीन सातबारा पत्रकी नोंद करण्यासह सुरू असलेली सुनावणी तुमच्या बाजूने देण्यासाठी आपल्या खासगी सहायकामार्फत अडीच लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी मंडल अधिकारी हंबीरराव हिंदुराव संकपाळ यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले तसेच लाच स्वीकारणारा खासगी सहायक शीतल नरसिंगा बेनाडे (रा. रूई, ता. हातकणंगले) याला रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रात्री ही कारवाई केली. ााबाबत डॉक्टर अरुण भूपाल पाटील (रा. लिगाडे मळा, जवाहरनगर, इचलकरंजी) यांनी याबाबत लाचलुचपत विभागाकडे फिर्याद दाखल केली होती. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : तक्रारदार अरुण पाटील यांनी शहापूर येथे गटनंबर ३२६ मधील १४.१२ गुंठे जमीन खरेदी केली होती. खरेदी केलेल्या जमिनीचे सातबारा पत्रकी नाव नोंद करण्यासाठी अर्ज दिला होता. या खरेदीबाबत हरकत घेतल्याने कबनूरचे (ता. हातकणंगले) मंडल अधिकारी हंबीरराव संकपाळ यांच्याकडे सुनावणी सुरू होती. या सुनावणीचा निकाल तुमच्या बाजूने लावण्यासह सातबारा पत्रकी नाव नोंद करून देतो, असे सांगून मंडल अधिकारी संकपाळ यांनी तक्रारदार पाटील यांच्याकडे तीन लाख रुपयांची लाच मागितली होती. याबाबत पाटील यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने १६ मे रोजी पडताळणी केली असता, मंडल अधिकारी संकपाळ यांनी तडजोडीअंती आपल्यासाठी अडीच लाख रुपये आणि खासगी सहाय्यक शीतल बेनाडे याच्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर मंडल अधिकारी संकपाळ यांच्या सांगण्यावरून गुरुवारी खासगी सहाय्यक बेनाडे याला तक्रारदार पाटील यांच्याकडून त्यांच्या जवाहनगर, लिगाडे मळा येथील हॉस्पिटलमधून २ लाख ५५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. तसेच मंडल अधिकारी संकपाळ यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. संबंधित कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अप्पर पोलीस अधीक्षक दिलीप कदम यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपअधीक्षक उदय आफळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीधर सावंत, मनोहर खणगांवकर, मनोज खोत, संदीप पावलेकर, सर्जेराव पाटील यांनी केली. (प्रतिनिधी)
सहायकामार्फत लाच घेतल्याप्रकरणी मंडल अधिकारी ताब्यात
By admin | Updated: May 22, 2015 00:48 IST