कार्यकर्तेही सरसावले : शिवसेना, मनसेची मोटारसायकल रॅली-कोल्हापूर दक्षिण‘दक्षिण’मध्ये काँग्रेस, भाजपचा भेटीगाठींवर जोरकोल्हापूर : मोटारसायकल रॅली, पदयात्रा आणि सभांद्वारे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील उमेदवारांनी आज, सोमवारी मतदारांशी संपर्क साधला. शिवाय उमेदवार व पक्षांच्या चिन्हांचे फलक, ध्वज हातात घेऊन डोक्यावर टोपी, गळ्यात स्कार्फ घातलेल्या कार्यकर्त्यांनी दिवसभर मतदारसंघ पिंजून काढला. यात काँग्रेसचे उमेदवार माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सकाळपासून मतदारांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले. दुपारी बारा वाजता सम्राटनगरमधील जिव्हेश्वर हॉलमध्ये बैठक घेतली. त्यानंतर पुन्हा सायंकाळी पाचपर्यंत त्यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी सकाळी वसगडे येथील ग्रामदैवत बिरदेव मंदिरापासून पदयात्रा सुरू केली. येथील वसाहती, माळवाडी परिसरातील मतदारांशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर दुपारी कोल्हापुरातील उपनगरांमध्ये त्यांनी पदयात्रा काढून मतदारांना आवाहन केले. अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ बेळगावचे आमदार संजय पाटील यांची सरनोबतवाडी व कणेरीवाडी तसेच खासदार राजू शेट्टी यांची खेबवडे (ता. करवीर) येथे सभा झाली.स्वतंत्र यंत्रणेने घेतला वेगपक्षासह संबंधित उमेदवारांनी आपली स्वतंत्र यंत्रणादेखील कार्यरत ठेवली आहे. प्रचाराची आज सायंकाळी मुदत संपल्यानंतर उमेदवारांची स्वतंत्र यंत्रणा अधिक वेगाने कार्यान्वित झाली. वॉर्ड, कॉलनी, गल्ली आणि गावनिहाय अशा स्वरूपातील यंत्रणेने आपल्याला नेमून दिलेल्या परिसरावर विशेष नजर ठेवली. विविध क्षेत्रांतील नोकरदार, व्यावसायिक, तरुण मंडळांचे कार्यकर्ते आदींच्या गाठीभेटी घेऊन त्यांना आपल्या उमेदवाराला मतदान देण्यासाठी दंडवत घातला.शक्तिप्रदर्शनाने ‘उत्तर’प्रचाराची सांगता : मोटारसायकल रॅली, भेटीगाठी, पदयात्रांद्वारे साधला संवाद--कोल्हापूर उत्तर कोल्हापूर :आज, सोमवारी प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने ‘कोल्हापूर उत्तर’ मतदारसंघातील उमेदवारांनी मोटारसायकल रॅली, पदयात्रांद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्याचबरोबर वैयक्तिक भेटीगाठींवर भर देऊन मतदारांशी संवाद साधला.शिवसेनेचे उमेदवार आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दसरा चौक येथून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी आ. क्षीरसागर यांच्यासोबत माजी महापौर उदय साळोखे, शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, कॉँग्रेसचे नगरसेवक रविकिरण इंगवले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. ही रॅली स्टेशन रोड, ताराराणी चौक, कदमवाडी, कसबा बावडा, रमणमळा, महावीर कॉलेज, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, शिवाजी पेठमार्गे जाऊन राजारामपुरी येथे समारोप झाला. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार आर. के. पोवार यांच्या प्रचारार्थही शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली.यावेळी उमेदवार पोवार यांच्यासह महापौर तृप्ती माळवी, नगरसेवक राजेश लाटकर, सुनील पाटील, माजी नगरसेवक अजित राऊत, आदी उपस्थित होते. लक्ष्मीपुरी येथील प्रचार कार्यालयापासून रॅलीला सुरुवात झाली. दसरा चौक, लक्ष्मीपुरी, उमा टॉकीज, सुभाष रोड, ध्यानचंद हॉकी स्टेडियम, संभाजीनगर, नंगीवली चौक, लाड चौक, महाद्वार रोड, शिवाजी पेठ, रंकाळा स्टॅँड, गंगावेश, जुना बुधवार पेठ, तोरस्कर चौक, सीपीआर हॉस्पिटल, छत्रपती शिवाजी पुतळा, बिंदू चौक मार्गे लक्ष्मीपुरी येथील प्रचार कार्यालय येथे समारोप झाला.भाजपचे उमेदवार महेश जाधव यांनी राजारामपुरी परिसरात पदयात्रा काढून शक्तिप्रदर्शन केले. सकाळी अकरा वाजता मारुती मंदिर येथून पदयात्रेला सुरुवात झाली. सर्व गल्लींमधून ही पदयात्रा नेण्यात आली. दुपारी दोन वाजता समारोप जनता बझार येथे झाला. यावेळी आमदार चंद्रकांतदादा पाटील, नगरसेवक आर. डी. पाटील, प्रभा टिपुगडे, विजय जाधव, दिलीप मैत्राणी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उमेदवार जाधव यांनी पदयात्रेनंतर मतदारसंघात मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेतल्या. भाकपचे उमेदवार रघुनाथ कांबळे यांनीही शहरातून पदयात्रा काढून शक्तिप्रदर्शन केले. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बिंदू चौक येथील पक्ष कार्यालयापासून पदयात्रेला सुरुवात झाली. यामध्ये उमेदवार कांबळे यांच्यासह ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे, नामदेव गावडे, सुशीला यादव, मिलिंद यादव, सतीशचंद्र कांबळे यांच्यासह महिला, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. बिंदू चौक, खासबाग, पापाची तिकटी, महापालिका, छत्रपती शिवाजी चौक, आईसाहेब महाराज पुतळामार्गे दसरा चौक येथे समारोप झाला. ‘मनसे’चे उमेदवार माजी आमदार सुरेश साळोखे यांनीही मोटारसायकल रॅली काढली. दुपारी एक वाजता शिवाजी पेठेतील महाकाली मंदिर येथून रॅलीला सुरुवात झाली. यामध्ये साळोखे यांच्यासह ‘मनसे’चे संपर्क जिल्हाध्यक्ष यशवंत किल्लेदार, जिल्हाध्यक्ष अभिजित साळोखे, माजी नगरसेवक चंद्रकांत साळोखे, नीलेश धुम्मा, विजय पाटील, मंगल शेटे, भारती आडूरकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅली कसबा बावडा, कदमवाडी, शिवाजी पेठ, आदी परिसरातून काढण्यात आली. नागाळा पार्क येथील प्रचार कार्यालय येथे समारोप झाला. करवीर‘करवीर’मध्ये रॅली, सभेनेच सांगताकोल्हापूर : करवीर विधानसभा मतदारसंघात सभा व रॅलीनेच प्रचाराची सांगता प्रमुख उमेदवारांनी केली. कॉँग्रेसचे उमेदवार पी. एन. पाटील यांनी हळदी येथे सभा घेतली, तर शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांनी येवती येथे कोपरा सभा घेऊन, तर राजेंद्र सूर्यवंशी यांनी शियेपासून रॅली काढून आपापल्या प्रचाराची सांगता केली. करवीर मतदारसंघात शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके, कॉँग्रेसचे पी. एन. पाटील, जनसुराज्य-शेकाप आघाडीचे राजेंद्र सूर्यवंशी, भाजपचे के. एस. चौगुले, ‘मनसे’चे अमित पाटील यांच्यात पंचरंगी लढत होत आहे. प्रचाराची सांगता झाली असली तरी खरी लढत चंद्रदीप नरके, पी. एन. पाटील व राजेंद्र सूर्यवंशी यांच्यात होत आहे. आमदार नरके यांनी काढलेली कार्यपुस्तिकाच विरोधकांनी लक्ष केल्याने संपूर्ण प्रचार विकासाभोवतीच फिरला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा अपवाद वगळता मतदारसंघात राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या सभा झाल्या नाहीत. आज, सोमवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सकाळपासून पदयात्रा काढून थेट भेटीगाठीवरच भर दिला जात होता. चंद्रदीप नरके यांनी सकाळी प्रयाग चिखली, आंबेवाडी, वडणगे परिसरात पदयात्रा काढून मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर त्यांनी येवती येथे पदयात्रा काढत कोपरा सभा घेऊन जाहीर प्रचाराची सांगता केली. पी. एन. पाटील यांनी सकाळी खुपिरे येथे प्रचारसभा घेतली व त्यानंतर त्यांनी हळदी येथे सभा घेऊन प्रचाराची सांगता केली. राजेंद्र सूर्र्यवंशी यांनी शियेपासून रॅली काढत थेट मतदारांशी संवाद साधला. वरणगे-पाडळी येथे येऊन त्यांनी आपल्या प्रचाराची सांगता केली. सूर्यवंशी यांच्यासाठी शामराव सूर्यवंशी, अक्षय पवार-पाटील, बाबासाहेब देवकर, शरद पाटील, बाळासाहेब वरुटे यांनी परिते येथे पदयात्रा काढली. के. एस. चौगुले यांच्यासह इतर उमेदवारांनी पदयात्रा व भेटीगाठी करीत प्रचाराची सांगता केली. (प्रतिनिधी)
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील उमेदवारांनी आज, सोमवारी मतदारांशी संपर्क साधला.
By admin | Updated: October 14, 2014 01:01 IST