कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील धामोड येथील पंचवीस वर्षीय दैवता तिबिले या महिलेचा कॅन्सरसदृश जबडा काढून त्याठिकाणी पायाचे हाड टाकून चेहरा पूर्ववत करण्याची यशस्वी शस्त्रक्रिया येथील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील दंतशल्यचिकित्साशास्त्र विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली. दंतशल्यचिकित्साशास्त्र विभागामध्ये झालेली ही अशा प्रकारची पहिलीच शस्त्रक्रिया आहे.दंतशल्यचिकित्साशास्त्र विभागांतर्गत दाखल रुग्ण दैवता तिबिले यांना तीन वर्षांपूर्वी जबड्यात गाठ उद्भवली होती. त्यावर खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. ही गाठ पुन्हा उद्भवली आणि त्याचे आकारमान पूर्वीपेक्षा अधिक दिसून आल्याने तिबिले ह्या सीपीआर रुग्णालयात दि. २१ ऑगस्ट रोजी दाखल झाल्या.तिबिले यांच्यावर दि. २३ ऑगस्ट रोजी दीर्घ वेळ शस्त्रक्रिया पार पडली. यामध्ये जबडा व जबड्यातील गाठ काढून पायाच्या हाडाला जबड्याचे स्वरुप देण्यात आले. नसेला नस जोडून रक्तपुरवठा सुरळीत करण्यात आला. जबडा काढल्यानंतर चेहऱ्याचे विद्रुपीकरण टाळण्यासाठी तब्बल १२ तास अथक परिश्रम घेऊन अतिशय गुंतागुतीची मायक्रोव्हॅस्कूलर शस्त्रक्रिया सुरु होती.या शस्त्रक्रियेसाठी खाजगी रुग्णालयात रुग्णास सहा लाख रुपये खर्च सांगण्यात आला होता. ही शस्त्रक्रिया महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत झाली. डॉ. अमोल लाहोटी, डॉ. गायत्री कुलकर्णी व डॉ. प्रियांका सावडकर, डॉ. नितीन जैसवाल, डॉ. प्राची पन्हाळे यांनी जबड्याच्या गाठीची तपासणी करुन तो जबडा काढून टाकला. डॉ. वसंत देशमुख व डॉ. शिवप्रसाद हिरुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या प्लास्टिक सर्जन डॉ. प्रशांत चौधरी व त्यांचे सहकारी डॉ. तन्मय, डॉ. त्यागराज, डॉ. नेहा यांनी पायाचे हाड काढून जबड्याचा आकार देऊन योग्य रक्त पुरवठा होण्यासाठी नसेला नस जोडण्याची मायक्रोव्हॅस्कूलर सर्जरी केली. या शस्त्रक्रियेसाठी भूलतज्ज्ञ विभागाचे प्रमुख डॉ. उल्हास मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या डॉ. ज्योती नैताम व त्यांच्या इतर सहकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. या सर्व प्रक्रियेत तत्कालीन अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे व अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
Kolhapur: कॅन्सरसदृश जबडा काढून पायाचे हाड लावले, महागडी शस्त्रक्रिया ‘सीपीआर’मध्ये झाली मोफत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 18:09 IST