इचलकरंजी : पंचगंगा नदी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शहरातील विविध ठिकाणी असलेल्या व औद्योगिक वसाहतींमधील सायझिंग व प्रोसेसिंग कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्याचे नमुने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने घेतले. या पथकाने प्रोसेसिंग कारखान्यांबरोबरच सायझिंग कारखान्यांच्या सांडपाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले असल्याने सायझिंग उद्योजकांमध्ये खळबळ उडाली. या पथकाकडून आणखीन चार दिवस नमुने घेण्यात येणार असून, कारखान्यांकडून होणाऱ्या प्रदूषणाबाबतचा अहवाल प्रांताधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे. पंचगंगा नदीमध्ये विविध औद्योगिक वसाहतींमधील व वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या उद्योगांचे दूषित सांडपाणी मिसळत असल्याने अशा घटकांवर कारवाई करण्यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक विकास मंडळ, सामाजिक संघटना व स्वाभिमानी युवा आघाडी यांची एक बैठक कोल्हापूर येथील विश्रामगृहावर बुधवारी झाली होती. या बैठकीमध्ये प्रदूषण मंडळाकडून विविध ठिकाणी असलेल्या औद्योगिक वसाहती व उद्योगांच्या सांडपाण्याचे नमुने घेऊन त्यांचा अहवाल तयार करून कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. उपरोक्त निर्णयाप्रमाणे गुरुवारी शहरातील इंडस्ट्रियल इस्टेट, खंजिरे औद्योगिक वसाहत, तांबे माळ, आदी ठिकाणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकांनी सायझिंग कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्याचे नमुने घेतले. त्यांच्याबरोबरच प्रोसेसिंग कारखान्यांचेही नमुने घेण्यात येणार आहेत. शहराबरोबरच हातकणंगले येथील लक्ष्मी औद्योगिक वसाहत व यड्राव येथील पार्वती इंडस्ट्रियल इस्टेट येथे असलेले सुमारे १६५ सायझिंग कारखाने, १५ पॉवर प्रोसेस व ७० हँड प्रोसेसमधून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्याचे नमुने घेतले जाणार आहेत. मंडळाच्या चार पथकांमार्फत सलग चार दिवस नमुने घेण्याचे काम सुरू राहणार आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाकडून पाण्याच्या नमुन्याबरोबरच संबंधित सायझिंग व प्रोसेसिंग कारखान्यांकडील बाहेर पडणारे सांडपाणी उघड्या गटारीत येत असेल, तर कडक कारवाई केली जाणार आहे. आणि तशा प्रकारचा अहवाल प्रांताधिकाऱ्यांना देऊन प्रसंगी कारखाने बंद करण्याची कारवाई केली जाणार असल्याने सायझिंगधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये असलेल्या कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्याचे नमुने गोळा करताना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी.
सांडपाण्याचे नमुने घेण्याची मोहीम सुरू
By admin | Updated: April 3, 2015 00:39 IST