कोपार्डे : येथील पाचाकटेवाडी (ता. करवीर) येथे ‘पिण्याच्या पाण्यासाठी झऱ्याचा आधार’, अशी बातमी प्रसिद्ध होताच शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. करवीर पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी यांच्यासह अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी लवकर पाचाकटेवाडीस भेट देऊन पाणीप्रश्नाबाबात ग्रास्थांबरोबर चर्चा केली व नवीन २२ लाखांच्या नळ पाणीपुरवठा योजनेतील कंत्राटदाराला कायम वाहणाऱ्या झऱ्यावर चेंबर बांधण्याचे आदेश दिले. यावेळी कंत्राटदाराने आरेरावी करीत आपण काम करणार नाही, अशी धमकी दिली. पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता एम. एम. देसाई, एम. बी. पाटील पासार्डे पैकी पाचाकटेवाडीत बुधवारी सकाळी आठ वाजता पोहोचले. राजेंद्र सूर्यवंशी यांनी कामाची पाहणी करून ग्रामस्थांनी या योजनेबाबत जागरूक राहावे. या योजनेनंतर पुन्हा पाणीपुरवठा योजनेसाठी निधी मिळणे अवघड असल्याचे सांगितले. काम योग्य न झाल्यास या कंत्राटदारास काळ्या यादीत टाकणार आहे, असा इशारा कंत्राटदाराला दिला. उपअभियंत्याने कायम स्वरूपात वाहणाऱ्या डोंगरावरील झऱ्यावर आणखी दोन ते तीन फुटाची खोली वाढवत चेंबर बांधावा, त्याचबरोबर नळ पाणीपुरवठा योजनेचे काम त्वरित पूर्ण करून पाणी योजना मार्गी लावावी, असा आदेश कंत्राटदार संजय पाटील यांना दिला. मात्र, यावेळी कंत्राटदार संजय पाटील यांनी अरेरावीची भाषा केल्यानंतर अशोक पायाकटे यांनी कंत्राटदार कोण? असा जाब विचारला. दोघांत बाचाबाची सुरू होऊन अशोक पाचाकटे हे संजय पाटील यांच्या अंगावर धावून गेले. यामुळे तणाव निर्माण झाला. यावेळी झऱ्याचे पाणी लोक पितात. येथे दारूच्या बाटल्या पडल्याचे दाखवत कंत्राटदाराचे कामगार दारू पिऊनच येथे काम करीत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पंचायत समितीचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी एम. बी. पाटील हे कुणाला काम दिल्याचे विचारले असता सांगत नाहीत, तर ते उडवाउडवीची उत्तरे देतात, असे ग्रामस्थांनी सांगितले. साहेब काहीही करा, पण दिवसातून एक वेळ तरी पाणी द्या, अशी विनवणी गावकऱ्यांनी यावेळी केली.दरम्यान, कंत्राटदार संजय पाटील, सहा. कंत्राटदार संभाजी पाचाकटे यांनी आम्ही यापुढे योजनेचे काम करणार नाही, असा दम दिला. मात्र, ग्रामस्थांनी दोघा कंत्राटदारांना धारेवर धरल्यानंतर सहायक कंत्राटदार संभाजी पाचाकटे याने काढता पाय घेतला. त्यामुळे तीन वर्षानंतर तरी पाणीप्रश्न सुटणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.(वार्ताहर) पाणी योजनेच्या कामाची चौकशी कराया पाणीपुरवठा योजनेसाठी २२ लाखांचा निधी मंजूर झाला असला, तरी ही योजना काही लाखांत गुंडाळल्याचा आरोप सरदार पाचाकटे यांनी केला. या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली. काम मंजूर होऊन तीन वर्षे झाली असली, तरी अजून हे काम अपूर्ण आहे. जे केले आहे त्याचा स्लॅब खराब आहे, बोगस काम करणाऱ्या कंत्राटदाराला हटवा, अशी मागणी त्यांनी केली.
पाचाकटेवाडीत झऱ्यावर चेंबर बांधा
By admin | Updated: June 4, 2015 00:44 IST