कोल्हापूर : शिंगणापूर-हणमंतवाडी रस्त्यावर सापडलेल्या अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात करवीर पोलिसांना यश आले. बाबासाहेब विष्णू गोसावी (वय ४०, रा. निगवे, ता. करवीर) असे त्यांचे नाव आहे. गेली आठ-दहा वर्षे तो घरापासून अलिप्त असून फिरस्ता म्हणून वावरत असल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले.
६ जुलैला सायंकाळी अनोळखी पुरुषाचा मृतदेह उसाच्या शेतानजीक मिळाला. त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत झाल्याचे शवविच्छेदन अहवालात दिसून आले, त्यानुसार करवीर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला. त्याची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध होताच नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात येऊन ओळख पटवली. बाबासाहेब गोसावी असे त्याचे नाव असून तो गेली आठ ते दहा वर्षे भंगार गोळा करून फिरस्ता म्हणून वावरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. खून झाल्याच्या संशयाने तो कोणाकोणाच्या संपर्कात होता याचा पोलीस तपास करत आहेत. त्याची पत्नी कल्पना गोसावी यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याला १६ वर्षांची एक मुलगी तर १८ वर्षांचा मुलगा आहे.