लोकमत न्यूज नेटवर्क
जयसिंगपूर : लोकमत वृत्तपत्र समूह व स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वाभिमानी युवा आघाडी, स्वाभिमानी विद्यार्थी परिषद, शिवार सामाजिक सेवा संस्था, स्वाभिमानी ब्लड डोनेट ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी जयसिंगपूरमधील सन्मती सभागृह येथे महारक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, तब्बल ११६ दात्यांनी रक्तदान केले. ‘लोकमत’चा रक्तदान महायज्ञ सामाजिक बांधिलकी जपणारे काम आहे, असे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.
‘नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं’ या ‘लोकमत’च्या राज्यव्यापी अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यंदा कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने या शिबिराला व्यापक स्वरुप देण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून जयसिंगपूरमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले.
प्रारंभी स्वागत शैलेश चौगुले यांनी केले. यावेळी स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, सावकर मादनाईक, डॉ. महावीर अक्कोळे, डॉ. सुरेश पाटील, त्रिशला चकोते, सागर शंभूशेटे, रामचंद्र शिंदे, सचिन शिंदे, डॉ. श्रीवर्धन पाटील, सौरभ शेट्टी, महावीर पाटील, डॉ. किरण पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सकाळी नऊ ते दुपारी तीन या कालावधीत ११६ पिशव्यांचे संकलन येथून झाले. या शिबिराला मिरज येथील सिध्दीविनायक व एम. एस. आय. ब्लड बँकेचे सहकार्य लाभले. ‘लोकमत’चे जयसिंगपूर प्रतिनिधी संदीप बावचे, इव्हेंट विभागाचे सचिन कोळी, तानाजी तारळे, आदी उपस्थित होते.
फोटो - १००७२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - ‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त जयसिंगपूर येथे शनिवारी महारक्तदान शिबिर झाले. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, सागर शंभूशेटे, रामचंद्र शिंदे, सावकर मादनाईक, शैलेश चौगुले, डॉ. किरण पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.