विश्वास पाटील, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या गळाला आमदार महादेवराव महाडिक यांची ताराराणी आघाडी लागली आहे. आघाडीशी युती करून भाजपने निवडणूक लढविण्याचे नक्की केले आहे. कुणी किती जागा लढवायच्या, याबाबतची प्राथमिक बोलणी झाली असून, मंगळवारी सकाळी झालेल्या बैठकीत त्या संदर्भातील घडामोडींना अंतिम स्वरूप दिले गेल्याचे सांगण्यात आले. शनिवारीच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील कोल्हापुरात आल्यावर त्यासंबंधी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. ‘चव्हाट्याला नाही बायको आणि भावकाईला नाही नवरा...’ अशी एक म्हण प्रचलित आहे. ती नव्या आघाडीबाबत चपखलपणे लागू होणारी आहे. राज्यात सत्तेत आल्यानंतर भाजप भंडारा व गोंदिया या जिल्हा परिषदांमध्ये निवडणुकीला सामोरा गेला; परंतु तिथे त्या पक्षाच्या हातातील सत्ता गेली आहे. राज्यात एकूण २६ महापालिका आहेत; परंतु तरीही एखाद्या महापालिकेत लोकांनी कुणाला स्वीकारले याबाबतची चर्चा राज्यभर होते. त्यात जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे पक्षाचे वजनदार मंत्री आहेत. त्यांच्या दृष्टीने महापालिकेची सत्ता हीदेखील प्रतिष्ठेची आहे. एकटा भाजप स्वबळावर लढला तर त्यांना सत्तेपर्यंत पोहोचता येत नाही व तशी लढायची पक्षाची मानसिकताही नाही. त्यामुळे तगडा भिडू सोबतीला घेऊनच मैदानात उतरायचे आणि सत्ता हस्तगत करायची, या दृष्टीने ही आघाडी आकार घेत आहे. आमदार महादेवराव महाडिक यांना कधी, कोणत्याच पक्षाचे वावगे नसते. ‘पक्षीय बांधीलकी’ हा विषय त्यांच्या कधीच खिजगणतीत नसतो. भाजपबरोबर आघाडी करण्यात त्यांचे दोन महत्त्वाचे फायदे आहेत. भाजपने मुलगा अमल यांना आमदार केले आहे. त्यामुळे अमल यांना कोल्हापूर दक्षिणमध्ये महापालिकेसाठी कमळाच्या चिन्हावरच ही निवडणूक लढवावी लागेल. भाजपबरोबर आघाडी केल्यामुळे त्यांची अडचण दूर होऊ शकते. तिथे ‘कमळ’ घेऊनच बहुतांशी उमेदवारांना रिंगणात उतरविले जाईल. साधारणत: त्या मतदारसंघात ३५ जागा येतील, असा अंदाज आहे. तिथे भाजप ३०, तर पाच ठिकाणी ‘ताराराणी’च्या चिन्हावर उमेदवार रिंगणात असतील. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात नगरसेवक सत्यजित कदम हे ताराराणी आघाडीचे उमेदवार असतील. या मतदारसंघात ताराराणीच्या वाट्याला जास्त जागा राहतील. भाजपला दक्षिणमधील ३० जागांसह उत्तरमधील विद्यमान नगरसेवक व पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते अशा किमान दहा ते पंधरा जागा देण्याची चर्चा सुरु आहे. म्हणजे भाजप ४५ आणि ताराराणी ३५ असेही सूत्र निश्चित होऊ शकते. महापालिकेच्या राजकारणात आतापर्यंत अपवाद वगळता भाजप व शिवसेनेचे नगरसेवक हे पक्षापेक्षा महाडिक यांच्याशीच जास्त एकनिष्ठ राहिल्याचा इतिहास आहे. त्यामुळे भाजप व महाडिक ही केमिस्ट्री जमण्यातही फारशी अडचण नाही. भाजपलाही महाडिक यांची संगत करण्यात कोणतीच अडचण नाही. कारण सर्वाधिक उमेदवार हे भाजपच्याच चिन्हावर लढणार आहेत. त्यामुळे त्या पक्षालाही शहरभर पक्ष वाढविल्याचे समाधान लाभेल. फॉर्म्युला काय.. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व आमदार महादेवराव महाडिक यांनी एकत्रित बसून उमेदवार निश्चित करायचे. उमेदवारांना भाजप व ताराराणी आघाडी असे दोन्ही पर्याय द्यायचे. त्याला सोयीचा असेल त्यानुसार उमेदवारी द्यायची व नव्या सभागृहात पहिला महापौर भाजपचा करायचा, असा हा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. विरोधात गोंधळात गोंधळ महाडिक व भाजप एकत्र येण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात आल्या असताना विरोधात मात्र सगळाच गोंधळात गोंधळ आहे. कोल्हापूर ‘उत्तर’चे काँग्रेसचे उमेदवार सत्यजित कदम हे काँग्रेस म्हणून स्वतंत्र लढण्यापेक्षा ताराराणी आघाडीचा घटक म्हणूनच रिंगणात उतरतील; कारण पक्षापेक्षा तेच नगरसेवक पुन्हा त्यांच्या मदतीला येणार आहेत. त्यामुळे उत्तरमध्ये काँग्रेसच्या ‘हाता’वर निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार शोधताना दमछाक होणार आहे. कोल्हापूर ‘दक्षिण’मध्ये माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे काँग्रेसच्या चिन्हावर लढतील. ही निवडणूक ते कितपत मनावर घेतात, यावरच काँग्रेसची स्थिती ठरणार आहे. त्यात पुन्हा जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, सतेज पाटील, मालोजीराजे यांच्यात फारसा चांगला समन्वय नाही. त्यामुळे काँग्रेसचे आव्हान कसे उभे राहणार, हे कोडेच आहे. राष्ट्रवादी-कोरे आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस व जनसुराज्य शक्ती हे पक्ष एकत्र येऊ शकतात. यापूर्वी या दोन पक्षांनीच ‘ताराराणी’ची सत्तेची मक्तेदारी मोडून काढली; परंतु आता या पक्षांतही तेवढी धमक राहिलेली नाही. आमदार हसन मुश्रीफ यांनी महापालिका निवडणुकीची सूत्रे खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे सोपविण्याचे जाहीर केले आहे. मुश्रीफ यांनी मनावर घेतले तरच काही चांगल्या जागा निवडून येऊ शकतात. ‘जनसुराज्य’ला मात्र उमेदवार मिळवितानाही दमछाक होईल, असे चित्र आहे. प्रभाग रचनेची प्रतीक्षा प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर लगेचच या घडामोडीवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. विद्यमान सभागृहातील ज्यांची प्रभागात ताकद आहे असे सुमारे १५ नगरसेवक भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यास तयार आहेत. महेश सावंत, किरण नकाते, किरण शिराळे, प्रकाश मोहिते, आदींकडे त्यासंबंधी प्राथमिक चाचपणीही केली आहे.
भाजपच्या गळाला ताराराणी आघाडी
By admin | Updated: July 22, 2015 00:41 IST