संदीप बावचे -- जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडीने भाजपप्रणित श्री दत्त विकास आघाडीवर एकतर्फी विजय मिळवित तालुक्यातील सर्वच गटांनी आपली एकत्रित ताकद सिध्द केली आहे. तर केंद्र व राज्यातील सत्तेचा टेंभा मिरवत तालुक्यात वर्चस्वाचा आव आणणाऱ्या भाजप व नेतृत्वाला मतदारांनीच झिडकारल्याने त्यांच्यावर आत्मचिंतनाची वेळ आली आहे.बाजार समिती आर्थिक अडचणीत असल्याने या बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वच पक्ष-गट तर एकत्र आले. तालुक्यातील सहकार, ग्रामपंचायत व राजकीय वर्चस्वावरून ज्या त्या गटाला जागा वाटपातून न्याय देण्यासाठी शिरोळ दत्त साखर कारखान्यावर बैठक झाली. या समितीसाठीच्या मतदारांत अत्यल्प संख्या असलेल्या भाजपलाही सत्तेतील पक्ष असल्याने दोन जागांवर निर्णयही झाला मात्र, केंद्रात व राज्यात सरकार असताना व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे पणन खाते असतानाही केवळ दोन जागा तालुक्यातील नेतृत्व करणाऱ्या मयूर उद्योग समूहाचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी मान्य न केल्याने निवडणूक लागली. त्यामुळे यड्रावकर, सा. रे. पाटील गट, स्वाभिमानी, शिवसेना एकत्र येऊन भाजपप्रणित दत्त विकास आघाडीच्या विरोधात लढत लागली. वास्तविक तालुक्यात यड्रावकर, सा. रे. पाटील गट, स्वाभिमानी संघटना यांचेच ग्रामपंचायत, सेवा संस्थेत वर्चस्व आहे. उलट भाजपचे मतदार केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतपत असतानाही भाजप व मोदींच्या नावावर बाजार समितीत चमत्कार करण्याचा आघाडी नेत्यांचा आत्मविश्वास पोकळ ठरला आहे. त्यामुळे तालुक्यात भाजपला स्थिरस्थावर करण्यासाठी नेते व कार्यकर्त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून भाजपला प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी पुन्हा एकदा बाजार समितीवर वर्चस्व सिद्ध केल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. असे असले तरी बाजार समितीत सध्या अनेक प्रश्नांची मालिका सुरू आहे. त्यासाठी सत्ताधारी आघाडीने बाजार समितीचा चेहरामोहरा बदलून तिला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. तालुक्यात भाजप पक्षाचा प्रभाव कमी असला तरी खासदार, आमदार, कारखान्यांचे अध्यक्ष व स्थानिक नेतेमंडळींच्या आव्हानाला प्रती आव्हान देत भाजप पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरले होते. मात्र त्यांना यश आले नाही. या निवडणुकीच्या निमित्ताने डॉ.संजय पाटील यांचा अनेक वर्षांनंतर तालुक्याशी संपर्क आला. दोन्ही पॅनेलमध्ये सुमारे एक हजार ते बाराशे मतांचा फरक असला तरी या निवडणुकीच्या निमित्ताने नेत्यांना भाजप पक्षाच्या प्रचाराची संधी मिळाली.
सत्तेचा टेंभा मिरवणाऱ्या भाजपला झिडकारले
By admin | Updated: July 6, 2016 00:28 IST