‘जनसुराज्य’च्या आडून ‘भाजप’ची बंडखोरी -: शिवसेनेला थोपविण्यासाठी खेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 01:09 AM2019-10-01T01:09:31+5:302019-10-01T01:10:42+5:30

गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप स्वबळावर लढले. यामध्ये दहापैकी सहा जागा शिवसेनेला तर दोन भाजपला मिळाल्या. लोकसभा निवडणुकीतही जिल्ह्यातील दोन्ही जागा शिवसेनेला देण्यावरूनच भाजपमध्ये अस्वस्थता होती.

BJP revolts around 'Jana Suraj' | ‘जनसुराज्य’च्या आडून ‘भाजप’ची बंडखोरी -: शिवसेनेला थोपविण्यासाठी खेळी

‘जनसुराज्य’च्या आडून ‘भाजप’ची बंडखोरी -: शिवसेनेला थोपविण्यासाठी खेळी

Next
ठळक मुद्देते ‘जनसुराज्य’कडून लढले नसले तरी ‘अपक्ष’ म्हणून रिंगणात राहू शकतात.

राजाराम लोंढे ।
कोल्हापूर : जिल्ह्यात शिवसेनेने दहापैकी आठ मतदारसंघांत पक्षाचे ‘ए बी’ फॉर्म देऊन उमेदवारी निश्चित केल्याने भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. महायुतीतील मित्रपक्ष जनसुराज्य पक्षाच्या साथीने शिवसेनेवर प्रतिडाव खेळण्याची रणनीती भाजपने आखली आहे. भाजपमधील इच्छुकांच्या हातात ‘नारळ’ देऊन ‘जनसुराज्य’च्या मार्फत रिंगणात उतरण्याची तयारी सुरू आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप स्वबळावर लढले. यामध्ये दहापैकी सहा जागा शिवसेनेला तर दोन भाजपला मिळाल्या. लोकसभा निवडणुकीतही जिल्ह्यातील दोन्ही जागा शिवसेनेला देण्यावरूनच भाजपमध्ये अस्वस्थता होती. त्यामुळे शिवसेनेचे सहा विद्यमान आमदार सोडून उर्वरित चार जागांवर भाजपने दावा केला होता. युती तुटली तर आपली तयारी असावी, म्हणून दहाही मतदारसंघांत भाजपने उमेदवार तयार ठेवले आहेत. सात जागी भाजप तर तीन जागा जनसुराज्य पक्षाला देण्याचा ‘फॉर्म्युला’ही ठरला आहे. त्यातूनच ‘कागल’मधून ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दोन वर्षांपासून प्रचारच सुरू केला होता. ‘चंदगड’ ताब्यात घ्यायचाच, या इराद्याने माजी राज्यमंत्री भरमूण्णा पाटील, गोपाळराव पाटील, अशोक चराटी यांना पक्षात घेतलेच, त्याचबरोबर आमदार संध्यादेवी कुपेकर यांचा प्रवेश ठरला होता. राधानगरीतून राहुल देसाई, शिरोळमधून अनिल यादव, राजवर्धन नाईक-निंबाळकर, ‘कोल्हापूर उत्तर’मधून महेश जाधव, सत्यजित कदम यांनी तयारी केली आहे.

पण जागावाटपात कोल्हापुरातील दोनच जागा भाजपच्या पदरात पडल्याने भाजपच्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. दोन जागा लढून जिल्ह्यातील सत्तास्थाने ताब्यात ठेवणे अडचणीचे ठरू शकते, त्यामुळे भाजपकडील इच्छुकांच्या हातात ‘जनसुराज्य’चा ‘नारळ’ हातात देण्याच्या हालचाली पडद्यामागे सुरू आहेत तसे सिग्नल रविवारी रात्री संबंधितांना वरिष्ठ पातळीवरून आल्याचे समजते.

भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने यांच्या नावाची ‘हातकणंगले’ तर नगरसेवक सत्यजित कदम यांच्या नावाची ‘कोल्हापूर उत्तर’मधून ‘जनसुराज्य’तर्फे चर्चा सुरू आहे. राधानगरीतून राहुल देसाई गुरुवारी (दि. ३) अर्ज दाखल करणार आहेत. डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी लढणार नसल्याचे सांगितले, त्यानंतर आता तयारी केली आहे. तोपर्यंत राष्टÑवादीने ‘गोकुळ’चे संचालक राजेश पाटील यांची उमेदवारी निश्चित केली आहे. त्यामुळे डॉ. बाभूळकर यांना ‘जनसुराज्य’ हा पर्याय राहू शकतो. शिरोळमधून राजवर्धन नाईक-निंबाळकर, अनिल यादव इच्छुक आहेत. ‘कागल’मधून समरजितसिंह घाटगे हे थांबणार नाहीत. ते ‘जनसुराज्य’कडून लढले नसले तरी ‘अपक्ष’ म्हणून रिंगणात राहू शकतात.


सेनेच्या अडचणी वाढणार!
युती होऊनही ‘जनसुराज्य’च्या माध्यमातून भाजपने खेळलेल्या खेळीमुळे शिवसेनेच्या अडचणी वाढणार आहेत. या बंडखोरीचा ‘राधानगरी’, ‘हातकणंगले’, ‘कोल्हापूर उत्तर’ या मतदारसंघांत मोठा फटका बसू शकतो.


‘जनसुराज्य’च्या संपर्कात असलेले इच्छुक मतदारसंघ

इच्छुक

  • हातकणंगले -अशोकराव माने
  • कोल्हापूर उत्तर- सत्यजित कदम
  • चंदगड -डॉ. नंदिनी बाभूळकर


अपक्ष’ म्हणून रिंगणात मतदारसंघ इच्छुक

  • राधानगरी राहुल देसाई
  • कागल समरजितसिंह घाटगे
  • शिरोळ राजवर्धन नाईक- निंबाळकर

Web Title: BJP revolts around 'Jana Suraj'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.