लोकमत न्यूज नेटवर्क
सरवडे : राज्यासह जिल्हा व कारखाना कार्यक्षेत्रातील गावांमध्ये कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण आणि या आजाराविषयी पसरलेले भीतीचे वातावरण यामुळे दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर बनत आहे. रुग्णांसाठी ऑक्सिजनची तत्काळ गरज भासत असल्याने बिद्री कारखाना चार आठवड्यांत ऑक्सिजन प्रकल्प उभारणी करीत असून, यातून दिवसाला ९० सिलिंडर ऑक्सिजन कार्यक्षेत्रातील रुग्णांना उपलब्ध होईल अशी माहिती बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी दिली.
बिद्री साखर कारखाना कार्यस्थळावर या प्रकल्पासंबंधी माहिती देताना अध्यक्ष पाटील बोलत होते.
ते म्हणाले, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी कोरोना आजाराची राज्यातील गंभीर अवस्था व ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन साखर उद्योगास ऑक्सिजन निर्मिती करण्याच्या सूचना केल्या होत्या. व्हीएसआयच्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली राज्य साखर कारखाना संघ यांच्या पुढाकाराने ऑक्सिजन प्रकल्प उभा करण्यासाठी काही कारखान्यांनी सहमती दर्शविली. त्या अनुषंगाने आपल्या कारखाना कार्यक्षेत्रातही कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांना ऑक्सिजन तत्काळ मिळावा यासाठी कारखान्याने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देशातील नामवंत अशा मे. साई नाँन कनेव्हन्शल एनर्जी नाशिक (एसएनसीई) या कंपनीस हा प्रकल्प उभारण्याचे काम दिले आहे. ५० लाख रुपये अंदाजित किमतीचा २५ मी. क्युब प्रति तास क्षमतेचा ऑक्सिजन प्रकल्प असून, चार आठवड्यात हा प्रकल्प कार्यान्वित होऊन दररोज ९० सिलिंडर ऑक्सिजन उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे हा प्रकल्प कारखाना कार्यक्षेत्रातील रुग्णांसाठी दिलासा देणारा ठरेल, असेही ते म्हणाले. संपूर्ण गळीत हंगाम कालावधीत ऊसतोड मजुरांसाठी कारखान्यावर कोविड सेंटरही उभारले होते असे ते म्हणाले.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक के. एस. चौगले उपस्थित होते.
०८ के. पी. पाटील