कुंभोज : येथील नव्याने बांधण्यात येणारी ग्रामसचिवालय इमारत मूळ ठिकाणी बांधण्यास विरोध झाल्याने ग्रामसचिवालय बांधकाम लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसत असतानाच ग्रामपंचायतीच्या वतीने गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत मूळच्या जागी ग्रामसचिवालयाचे भूमिपूजन आमदार राजू आवळे तसेच माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती प्रवीण यादव, वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, एकमत घडविण्यासाठी अगदी मुहूर्ताच्या वेळेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत भूमिपूजनानंतर नवीन जागेसाठी जिल्हा परिषदेकडे एकत्रित पाठपुरावा सुरूच ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय झाला.
ग्रामपंचायतीच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी अथक प्रयत्नाने ग्रामसचिवालयाचा प्रश्न मार्गी लावला. निधीच्या उपलब्धतेनंतर बांधकामाचा कार्यारंभ आदेशही निघाला. तथापि, वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांनी अपुऱ्या जागेच्या कारणास्तव मूळ जागी ग्रामसचिवालय उभारण्यास विरोध दर्शविला होता . ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत भूमिपूजन करून पुढील पाठपुरावा करण्याचे ठरले. दरम्यान, भूमिपूजन प्रसंगी आमदार राजू आवळे यांनी कुंभोजला विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले. माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी ग्रामसचिवालयासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी ग्रामसचिवालयासाठी गरज पडल्यास कन्या शाळेच्या आवारातील काही जागा देण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले.
भूमिपूजन प्रसंगी पं. स. सदस्या सपना पांडव, सरपंच माधुरी घोदे, उपसरपंच दाविद घाटगे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, आघाडी प्रमुख बाबासाहेब चौगुले, किरण माळी, प्रकाश पाटील, सुरेश भगत, किरण नामे, संतोष माळी, डॉ. सत्यजित तोरस्कर, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.