इचलकरंजी : रुई (ता.हातकणंगले) येथे भरधाव वेगाने आलेल्या कारने मोटारसायकलला धडक दिली. या धडकेमध्ये एक अल्पवयीन मुलगा ठार झाला. अल्लाउद्दीन समीर बारगीर (वय १४, रा. धनगर माळ, रुई) असे त्याचे नाव असून, नरेश सागर शेंडगे हा मुलगा जखमी झाला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, अल्लाउद्दीन हा मोटारसायकल (एमएच ०९ डीव्ही ९३३६) वरून रुई येथून इंगळी गावाकडे जात होता. तो रुई पंचगंगा पुलाजवळ आला असता समोरून भरधाव कारने त्याच्या मोटारसायकलला धडक दिली. धडकेमध्ये अल्लाउद्दीन याचा जागीच मृत्यू झाला. तसेच जखमी नरेश याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली असून, तेथून तो गुन्हा हातकणंगले पोलीस ठाण्यात वर्ग करण्याचे काम सुरू होते.
चौकट
वळणाचा रस्ता
रुई-इंगळी हा रस्ता पंचगंगा नदीमार्गे जातो. रुई या गावातून बाहेर पडताच तेथे असलेल्या स्मशानभूमीजवळ रस्ता वळणाचा आहे. त्यामुळे वाहनधारकास या रस्त्याचा अंदाज येत नसल्याने याठिकाणी छोटे-मोठे अपघात होत असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.