चंदगड (जि. कोल्हापूर) : निट्टूर (ता. चंदगड) येथे मळणी काढण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांवर मधमाश्यांनी हल्ला केल्याने एक पुरुष आणि पाच महिला जखमी झाल्या. या जखमींवर कोवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
मळणीला सुरुवात करण्यापूर्वीच शेतातील माकडांनी झाडावर अगोदरच असलेल्या मधमाश्यांना त्रास देऊन उठवले, संतापलेल्या मधमाश्यांनी मळणीसाठी आलेल्या सर्व शेतकऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. अचानक मधमाश्यांनी हल्ला चढवल्याने सर्वजण जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले.
---------------------------------------
आर्थिक विवंचनेतून कारखानदाराची आत्महत्या
इचलकरंजी (जि.कोल्हापूर) : येथील कापड मार्केट हौसिंग सोसायटीत राहणाऱ्या एका कारखानदाराने कारखान्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवप्रसाद काशिराम सेन (वय ५४) असे त्यांचे नाव आहे. शिवप्रसाद हे हौसिंग सोसायटीत कुटुंबीयांसह राहतात. त्यांचा वधर्मान चौक परिसरात वार्पिंगचा व्यवसाय आहे. आर्थिक विवंचनेतून त्यांनी कारखान्यातील लोखंडी ॲगलला दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.
---------------------------------------
सांगली जिल्ह्यात २९२४ शेतकऱ्यांची द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी
सांगली : जिल्ह्यातून दीड हजार हेक्टर क्षेत्रातील द्राक्षे दरवर्षी युरोप आणि इतर देशांत निर्यात होतात. यावर्षी जिल्ह्यातील दोन हजार ९२४ शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यातीसाठी कृषी विभागाकडे नोंदणी केली आहे. दरम्यान, २० डिसेंबरपर्यंत निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे नोंदणी करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून केले आहे. जिल्ह्यात २८ हजार हेक्टर द्राक्षबागांचे क्षेत्र आहे. जिल्ह्यामधून गेल्यावर्षी युरोपियन देशात आठ हजार ४८४ टन, तर इतर देशात नऊ हजार ७७० टन द्राक्षे निर्यात झाली आहेत.
---------------------------------------
ड्रेनेजच्या कठड्याला धडकून दुचाकीस्वार ठार
कऱ्हाड (जि.सातारा) : गुहागर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर अभयचीवाडी (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीत दुचाकी रस्त्याकडेच्या ड्रेनेजच्या कठड्याला धडकून दुचाकीस्वार ठार झाला.
कृष्णत हणमंत ढगाले (रा. साकुर्डी. ता. कऱ्हाड) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. ढगाले हे खोडशीतील कोयना दूध संघात नोकरीस होते. ड्यूटी संपल्यानंतर ते दुचाकीवरून घरी जाण्यासाठी निघाले.
---------------------------------------
महामार्गाच्या प्रत्येक विभागाचे काम पाहण्यासाठी अभ्यासगट करणार
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाची तीन टप्प्यात विभागणी करून प्रत्येक विभागाचे कामकाज पाहण्यासाठी अभ्यासगट तयार करण्याचा निर्णय कोकण हायवे समन्वय समितीने घेतला आहे. या समितीची पहिली बैठक संजय यादवराव यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने झाली. या बैठकीत कोकण हायवे समन्वय समितीचे प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते. पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर आणि पुढे खेडपर्यंत दोनशे किलोमीटर महामार्गाचा अभ्यास दौरा सोमवार, ८ रोजी यशवंत पंडित यांच्या समन्वयातून आयोजित करण्यात आला आहे.
---------------------------------------
प्रवीण बांदेकर यांना रोहमारे ट्रस्ट पुरस्कार
सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) : कोपरगाव येथील भि. ह. रोहमारे ट्रस्टतर्फे देण्यात येणाऱ्या यावर्षीच्या पुरस्कारासाठी कादंबरी या विभागात प्रसिद्ध कादंबरीकार प्रवीण बांदेकर यांची निवड करण्यात आली आहे. ‘‘इंडियन ॲनिमल फार्म''’ या कादंबरीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. अकरा हजार रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सोमवारी, ६ डिसेंबरला कोपरगाव येथील सोमय्या महाविद्यालयात हा पुरस्कार वितरण होणार आहे.
---------------------------------------