Become 'gelatin' .. | ‘सरस’ बनून दाखवा..
‘सरस’ बनून दाखवा..

ठळक मुद्देकोल्हापूरचे समाजमन असे आहे की ते एखाद्याला आवडले तर जेवढ्या ताकदीने खांद्यावर उचलून घेते तेवढ्याच ताकदीने ते खाली आपटते. संसदेतील छाप आणि विकास या दोन्ही पातळ्यांवर ‘सरस’ ठरून दाखवा...

-विश्वास पाटील

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे १९६२ ला दिनकरराव यादव अध्यक्ष झाले. तेव्हा बाळासाहेब माने उपाध्यक्ष, तर सदाशिवराव मंडलिक हे बांधकाम सभापती होते. पुढे यादव हे शिरोळ मतदारसंघातून आमदार झाले; तर माने पाचवेळा व मंडलिक चारवेळा खासदार झाले. याच मंडलिक व माने यांचे वारसदार म्हणून संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्यावर कोल्हापूरच्या जनतेने खासदार म्हणून मोठा विश्वास दाखवला आहे. हा कर्तृत्वाचा वारसा पुढे नेण्याचे आव्हान या दोघांसमोर आहे.

दिवंगत मंडलिक हे बंडखोर वृत्तीचे होते. ‘कायम लोकांत राहणारा माणूस’ अशी त्यांची ओळख व तीच त्यांची ताकद होती. मी एक बातमीदार म्हणून वीस वर्षांत त्यांना कधी फोन केला व त्यांनी तो घेतला नाही असा अनुभव नाही. संजय मंडलिक यांच्यावर मात्र ‘नॉट रिचेबल’ अशी टीका प्रचारात झाली. सगळ्यांत अगोदर त्यांना ही प्रतिमा पुसून काढावी लागेल. दिवंगत मंडलिक यांचा ऊसदरापासून विकासाच्या प्रश्नांपर्यंत अभ्यास व स्वत:चे एक ‘अंडरस्टँडिंग’ होते. प्रश्नांचा पाठपुरावा करण्यात ते पुढे असत. ते सतत वृत्तपत्रांतील बातम्यांच्या केंद्रस्थानी राहिले. संजय मंडलिक यांना मात्र सतत प्रसिद्धीत राहण्याची सवय नाही. त्यांचा स्वभावही संयमी आहे. कानांत बोलणाऱ्यांचा त्यांना तिटकारा आहे. बाळासाहेब माने प्रशासनात वाकबगार होते. कट्टर बहुजननिष्ठ म्हणून त्यांची प्रतिमा होती. ते फर्डे वक्ते होते. त्यामुळे त्यांना लोक गमतीने ‘माने एक्सप्रेस’ म्हणायचे. धैर्यशील यांच्याकडेही हा गुण आहे. संजय मंडलिक व धैर्यशील यांच्या विजयांत त्यांची स्वत:ची प्रतिमा, वाडवडिलांची पुण्याई आणि प्रचलित राजकारणातील मोदी त्सुनामीचा फायदा झाला.

आता त्यांच्या पक्षाचेच सरकार केंद्रात सत्तेत येत आहे, त्यामुळे सबब सांगायलाही लोकांनी जागा ठेवलेली नाही. दिवंगत मंडलिक व माने यांच्यावेळचा काळ वेगळा होता. त्यावेळी विरोधी पक्ष एवढा आक्रमक नव्हता. सोशल मीडियाचा वॉच नव्हता. हिशोब मागणारा समाज नव्हता. त्यामुळे नव्या खासदारांसमोरील आव्हाने मोठी आहेत. गेल्या पाच वर्षांत कोल्हापूरला पुढे नेऊ शकेल असा एकही प्रश्न सुटलेला नाही. पंचगंगा प्रदूषणापासून कोकण रेल्वेपर्यंत अनेक प्रश्र्न रखडले आहेत. अंबाबाई विकास आराखडा कागदावर आहे. इचलकरंजीच्या पाणीप्रश्र्नाचा चक्रव्यूह तयार झाला आहे. या सगळ््या प्रश्र्नांना हे तरुण खासदार किती ताकदीने भिडतात यावरच त्यांच्या नेतृत्वाची छाप पडणार आहे. ज्यांचा पराभव झाला आहे, ते नव्या लढाईसाठी आजपासूनच शड्डू मारून तयार आहेत. त्यामुळे तुमच्या प्रत्येक गोष्टीची त्यांच्याशी तुलना होणार आहे आणि कोल्हापूरचे समाजमन असे आहे की ते एखाद्याला आवडले तर जेवढ्या ताकदीने खांद्यावर उचलून घेते तेवढ्याच ताकदीने ते खाली आपटते.

मोठ्या मताधिक्क्याने समाजमनाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत त्याचे ओझे कोल्हापूरला विकासाच्या मार्गावर नेऊन तुम्हांला पेलावेच लागेल. शाहू महाराजांच्या पुण्याईवर कोल्हापूर समृद्ध झाले आहे. आता त्याला आणखी पुढे न्यायचे झाल्यास एखादी हेवी इंडस्ट्री येण्याची गरज आहे. संसदेतील छाप आणि विकास या दोन्ही पातळ्यांवर ‘सरस’ ठरून दाखवा...


Web Title: Become 'gelatin' ..
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.