लोकमत न्यूज नेटवर्क
कसबा सांगाव : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यातच म्युकरमायकोसिस या नवीन रोगाचेही रूग्ण वाढत आहेत. या दोन्ही आजारांबाबत नागरिकांनी व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दक्ष राहावे, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी केले. कसबा सांगाव (ता. कागल) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र भेटीवेळी ते बोलत होते.
कागल तालुक्यामध्ये कसबा सांगाव व परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. याबाबत घाटगे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. कोरोना प्रतिबंधक लसीची उपलब्धता व लसीकरण याबाबतही त्यांनी माहिती घेतली.
यावेळी ते म्हणाले की, एकीकडे आपण सर्वजण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी झुंज देत आहोत तर दुसरीकडे म्युकरमायकोसिस हा फंगल इन्फेक्शनचा नवा आजार डोके वर काढत आहे. त्यामुळे कोरोनाशी दोन हात करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर याबाबत मोठी जबाबदारी आली आहे.
यावेळी वैद्यकीय अधिकारी पौर्णिमा शिंदे, लसीकरण विभागप्रमुख आय. व्ही. कोळी, सरपंच रणजित कांबळे, राजे बॅंकेचे संचालक ॲड. बाबासाहेब मगदूम, सुदर्शन मजले, रणजित जाधव, कुमार दिवटे, श्रीकांत माळी, आदी उपस्थित होते.
---
फोटो कॅप्शन :- कसबा सांगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लसीकरणासाठी आलेले नागरिक व कोरोना योद्ध्यांशी शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी संवाद साधला. यावेळी सरपंच रणजित कांबळे व मान्यवर उपस्थित होते.