कोल्हापूर : तमिळनाडूतील कर्मठ मुस्लिम कुटुंबात चार भिंतींच्या आत जगणाऱ्या स्त्रीच्या बंदिस्त जगण्याचे आर्त मांडणारी ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ ही कादंबरी वाचकांच्या भेटीला येत आहे. तमिळनाडूतील सलमा या लेखिका व कवयित्रीने लिहिलेल्या या प्रदीर्घ कादंबरीचा अनुवाद लेखिका सोनाली नवांगुळ यांनी केले आहे. या कादंबरीचे आज, रविवारी पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या राम गणेश गडकरी सभागृहात सायंकाळी ६ वाजता प्रकाशन होणार आहे. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक विश्राम गुप्ते तसेच मुंबईतील सहायक आयकर आयुक्त अभिनय कुंभार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे असतील. भारतीय प्रादेशिक लेखिकांना मराठी साहित्यात आणण्याच्या उद्देशाने संपादक कविता महाजन यांनी या उपक्रमाची सुरुवात केली. त्या मालिकेतील ही सर्वांत प्रदीर्घ कादंबरी आहे. कादंबरीची लेखिका सलमा ही स्वत: एका कर्मठ मुस्लिम कुटुंबात वाढली आहे. प्रातिनिधिक स्वरूपात एका धर्माची ही मांडणी असली, तरी सर्वच धर्मांमध्ये कमी-अधिक प्रमाणात स्त्रियांना या जोखडी व्यवस्थेत जगावे लागते. आपल्या भोवती जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या भावविश्वाचे कंगोरे तिने कादंबरीत मांडले आहेत. त्यांना पारतंत्र्याची जाणीवच नाही आहे; पण त्या विरोधात त्या आपल्यापरीने बंड करताहेत, स्वत:च्या जगण्याचे मार्ग शोधताहेत. ही कादंबरी मराठी वाचकांपर्यंत मनोविकास प्रकाशनने पोहोचविली आहे. सोनाली नवांगुळ यांनी तीन वर्षांपूर्वी अपंग धावपटू आॅस्कर पिस्टोरिअस याचे ‘ड्रीम रनर’ हे पुस्तक मराठीत आणले होते. ज्याच्या चार आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. तीन महिन्यांपूर्वी वृत्तपत्रातील सदर लेखनावर आधारित ‘स्वच्छंद’ हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. परदेशी भाषांमध्येही अनुवादित झालेली ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ ही कादंबरी आता मराठीत येत आहे.
बंदिस्त जगण्याचे आर्त ‘मध्यरात्रीनंतरचे तास’
By admin | Updated: May 10, 2015 01:00 IST