कोल्हापूर : पर्यावरण, पाणी, स्वच्छता याविषयी समाजात जाणीव जागृती करणे आवश्यक आहे. याकरिता लोक सहभाग वाढवावा लागेल. सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेतून हे काम महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर महापालिकेचे माजी आयुक्त व राज्याचे भूजल सर्वेक्षण विभागाचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले. कोल्हापुरातील शिक्षण क्षेत्रात सक्रिय असलेल्या मान्यवरांनी स्थापन केलेल्या दर्पण फाउंडेशन बहुउद्देशीय संस्थेच्या स्थापनेप्रसंगी ते बाेलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षण सेवक समितीचे राज्य अध्यक्ष भरत रसाळे होते.
रसाळे म्हणाले, ध्येयाचा ध्यास घेतला की कष्टाचा त्रास होत नाही, फाउंडेशनचे सर्व संचालक व सभासद निश्चितपणे सामाजिक कार्यात वाहून घेतील असा विश्वास व्यक्त केला. फाउंडेशनचे अध्यक्ष कुमार पाटील यांनी विविध उपक्रम आणि वाटचालीविषयी माहिती दिली. फाउंडेशनने केवळ कार्यक्रम न करता नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत. संस्था मोठी होण्यासाठी ध्येयाने कार्य करण्याची गरज आहे, असे मत गुरुबाळ माळी यांनी व्यक्त केले.
यावेळी शिक्षक नेते सुधाकर सावंत, खासगी शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन महादेव डावरे, प्राचार्य प्रशांत सालियन, नक्षत्र ग्राफिक्सचे श्रीपाद रामदासी, गायक दिनेश माळी, स्वागत सविता देसाई, उपाध्यक्ष राम भोळे यांनी प्रास्ताविक केले. महेंद्र कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. संजय कडगावे यांनी आभार मानले. शिवाजी भोसले, मनपा शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष संजय पाटील, किरण खटावकर, नितीन सोनटक्के , सूरज नाईक, आदींनी ऑनलाइन उपस्थिती लावली.