कोल्हापूर : शहरासाठीच्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या पूर्ततेसाठी आता आमदार राजेश क्षीरसागर यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन माजी मंत्री सतेज पाटील यांनी आज शनिवारी रात्री येथे एका कार्यक्रमात बोलताना केले. महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती सचिन चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या समारंभात सतेज पाटील बोलत होते. यावेळी सचिन चव्हाण यांच्यातर्फे प्रभागातील कचरा उठावासाठी ई रिक्षा, करुणालय संस्थेला कपाटे प्रदान, गणवेश वाटप करण्यात आले. थेट पाईपलाईन योजनेला वन विभागाची अडचण निर्माण झाली असून त्यातून मार्ग काढण्याची भूमिका क्षीरसागर यांनी घ्यावी, ही योजना आम्ही मंजूर करुन आणली. त्याला निधीही मिळाला आहे. आता सत्तेत कोणतेही पक्ष असोत, शहराच्या विकासासाठी सगळे मिळून आपण प्रयत्न करुया असे आवाहन पाटील यांनी केले. नाथागोळे तालमीची इमारत बांधून देण्याची घोषणा राजेश क्षीरसागर यांनी यावेळी केली. नगरसेवक आदिल फरास यांनी सर्वांचे स्वागत केले. उपमहापौर मोहन गोंजारे, आर. के. पोवार, राजेश लाटकर, यांची भाषणे झाली. समारंभास महापौर तृप्ती माळवी, जि. प. उपाध्यक्ष शशिकांत खवरे, वसंत कोगेकर, संजय मोहिते, रोहिणी काटे, महेश जाधव, विजय देवणे उपस्थित होते.
थेट पाईपलाईनसाठी सेनेने पुढाकार घ्यावा
By admin | Updated: December 21, 2014 00:11 IST