गणपती कोळी -- कुरुंदवाड--विधानपरिषद निवडणुकीत स्वीकृत सदस्यांनाही मतदानाचा अधिकार मिळाल्याने निवडणुकीत होणाऱ्या घोडेबाजारात त्यांचीही गणती होणार आहे. त्यामुळे या सदस्यांनाही सोन्याचे दिवस आल्याने उत्साहाचे वातावरण आहे, तर या निर्णयामुळे उमेदवारांना अतिरिक्त आर्थिक फटका बसणार असल्याने उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे.एरवी विधानपरिषद निवडणूक कधी झाली ? कोण मतदान केले? हे सर्वसामान्य जनतेला समजतही नसे. मात्र, या निवडणुकीसाठी लागलेली चुरस, मातब्बर मंडळींनी केलेली प्रतिष्ठा, ईर्ष्या अन् यातून होत असलेला घोडेबाजार यामुळे ही निवडणूक गाजत आहे. नगरपालिका, महानगरपालिका नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापती असे केवळ ३५० मतदार आहेत. त्यामुळे मतदारांना वश करण्यासाठी उमेदवारांना सहल, भेटवस्तू याबरोबरच लाखमोलाचे बंद पाकीटही दिले जाते. त्यामुळे या मतदारांना ही निवडणूक म्हणजे सोन्याचे दिवसच असते.नगरपालिका, महानगरपालिका सभागृहात नगरसेवकांबरोबर काम करणारे स्वीकृत नगरसेवक या मतदानापासून वंचित होते. सभागृहातील अविश्वास ठरावासारख्या महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत स्वीकृत सदस्यांना मतदानाचा अधिकार नसतो. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीतही मतदानापासून ते वंचित होते. निवडणुकीत सहकारी नगरसेवकांच्या घडामोडी ऐकण्यापलीकडे त्यांचे काम नव्हते. जिल्ह्यात असे ३८ स्वीकृत सदस्य असून, या निवडणुकीत दात काढलेल्या सापासारखी त्यांची अवस्था झाली होती. कायद्याच्या चौकटीतूनच त्यांची स्वीकृत सदस्य निवड झाल्याने त्यांनाही मतदानाचा अधिकारी मिळावा, अशी मागणी या सदस्यांतून होत होती. अखेर निवडणूक आयोगाने कायद्यातील तरतुदींचा विचार करून त्यांनाही मतदानाचा अधिकार बहाल केल्याने या सदस्यांनाही संधीचे सोने करण्यास मिळणार असल्याने उत्साहाचे वातावरण आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून मतांसाठी प्रत्येक तालुक्यात इच्छुक उमेदवारांचा दौरा करून मतदारांना आमिषे दिली. मात्र, या स्वीकृत सदस्यांना मताचा अधिकार नसल्याने इच्छुकांनी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नव्हते. आता त्यांनाही अधिकारी मिळाल्याने ते संधीची वाट पाहत आहेत, तर या निर्णयामुळे उमेदवारांना अतिरिक्त फटका बसणार असल्याने त्यांच्यासाठी डोकेदुखी वाढली आहे.
स्वीकृत सदस्यांत उत्साह
By admin | Updated: November 28, 2015 00:10 IST