हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) नगरपालिका स्थापन करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अंतिम मंजुरी दिली. या मंजुरीचे पत्र पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व जनता समूहाचे संस्थापक आण्णासाहेब शेंडुरे यांच्याकडे सुपूर्द केले. शासनाच्या या निर्णयाने कृती समितीने उभारलेल्या लोकलढ्याचा अभूतपूर्व विजय झाला आहे. हुपरी ग्रामस्थांनी शुक्रवारी साखर-पेढे वाटून, फटाके उडवून जल्लोष केला. जनतेने दिलेल्या पाठबळामुळे नगरपालिका मंजूर झाली असून, हे यश हुपरीकरांचे असल्याची भावना कृती समितीचे निमंत्रक अमजद नदाफ, सहनिमंत्रक बाळासाहेब कांबळे यांनी व्यक्त केली.चांदीच्या दागिन्यांसाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध असणाऱ्या हुपरीत नगरपालिका स्थापन करावी यासाठी गेली अनेक वर्षे शासनाकडे मागणी होत होती. मात्र, गावची लोकसंख्या ५0 हजारांच्या पुढे गेली तरी शासन त्याकडे दुर्लक्ष करीत होते. गावचा विस्तार वाढल्यामुळे नागरी सुविधा देण्यासाठी ग्रामपंचायत अपयशी ठरत होती. त्यामुळे गावचा विकास पूर्ण खुंटला होता. याप्रकरणी हुपरी ग्रामस्थांनी कृती समिती स्थापन केली. कृती समितीने हुपरी नगरपालिका मागणीसाठी १५ जून २0१५ पासून २१ दिवस विविध आंदोलने केली. त्यासाठी बेमुदत उपोषण सुरू केले. हुपरीकरांनी ‘बंद’चा इशारा दिल्यामुळे आमदार सुरेश हाळवणकर, सुजित मिणचेकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना हुपरी गावची स्थिती सांगून नगरपालिका मंजुरीस तत्त्वत: मंजुरी मिळविली. कृती समितीने पाठपुरावा सुरूच ठेवल्यामुळ शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेश हाळवणकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना हुपरीला नगरपालिकेसाठी अंतिम मंजुरी मिळावी, असे सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अंतिम मंजुरी पत्रावर स्वाक्षरी केल्याने नगरपालिकेचा मार्ग मोकळा झाला. पेढे वाटून आनंदोत्सवनगरपालिका मंजुरीची माहिती मिळताच हुपरीत साखर-पेढे वाटून गुलालाची उधळण करण्यात आली. यावेळी कृती समितीचे निमंत्रक अमजद नदाफ, सहनिमंत्रक बाळासाहेब कांबळे, अशोक खाडे, मुबारक शेख, तानाजी घोरपडे, प्रवीण कुंभोजकर, विनोद खोत, जि.प.चे माजी अध्यक्ष नानासाहेब गाठ, जि.प.चे सदस्य किरण कांबळे, माजी सरपंच दौलतराव पाटील, मंगलराव माळगे, प्रतापसिंह देसाई, गणेश कोळी, नितीन गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख अमोल देशपांडे, वीरकुमार शेंडुरे, लालासाहेब देसाई, विशाल चव्हाण, जयकुमार माळगे, विद्याधर कांबळे, जीवन नवले, पृथ्वीराज गायकवाड, संकेत कानडे-पाटील यांच्यासह ग्रामपंचायतीचे कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हुपरी नगरपालिका स्थापनेस मंजुरी
By admin | Updated: April 8, 2017 00:20 IST