कोल्हापूर : येथील गंगावेश ते छत्रपती शिवाजी पूल हा ‘आखरी रास्ता’ संबोधला जाणारा हा प्रतिवर्षी पूरबाधित मार्ग असल्याने, तो कायमस्वरूपी टिकाऊ काँक्रीटचा करण्याबाबत कार्यवाही करावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेना संयुक्त उत्तरेश्वर पेठ आखरी रास्ता कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले. त्यांनी मागणीचा विचार करू व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना याविषयी पाठपुरावा करावा, असे सांगितले.
निवेदनात म्हटले की, गंगावेश ते छत्रपती शिवाजी पूल हा रस्ता पन्हाळगड, विशाळगड, जोतिबासह अनेक प्रमुख महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणारा मार्ग असून, येथून अवजड वाहनांसह मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. रस्त्याच्या बाजूस महानगरपालिकेचे पंचगंगा हॉस्पिटल असून पेशंट, नातेवाईक, रुग्णवाहिका आणि इतर वाहनांची वर्दळ असते, दरवर्षीच्या पूरपरिस्थितीने हा मार्ग खराब होतो. या रस्त्यासाठी तीन वर्षे जनांदोलन सुरू आहे. हा रस्ता प्रतिवर्षी पूरबाधित होत असल्याने काँक्रीटचा करावा, अशी मागणी कृती समितीने केली. तसा प्रस्ताव शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाने पाठवला आहे.
यावेळी किशोर घाटगे, रियाज बागवान, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, नीलेश हंकारे, सुरेश कदम, राकेश पाटील, राकेश पोवार, सनी अतिग्रे, सागर कलघटगी, अनंत पाटील, सूरज धनवडे आदींची उपस्थिती होती.