कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या स्वीकृत संचालक अर्चना आनंदराव पाटील व संचालक रणजितसिंह कृष्णराव पाटील यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे सहकार निवडणूक प्राधिकरणाने म्हटले आहे. याबाबत निबंधकांनी उचित कारवाई करावी, अशी सूचना प्राधिकरणाचे सचिव डॉ. आनंद जोगदंड यांनी विभागीय सहनिबंधकांना केली आहे.नवीन वटहुकुमामुळे जिल्हा बॅँकेचे अकरा विद्यमान संचालक अडचणीत आले आहेत. अकरा संचालक अपात्र ठरले तर संचालक मंडळ अल्पमतात येऊन बॅँकेवर प्रशासक येईल, या भीतीपोटी सत्तारूढ गटाने ज्येष्ठ संचालक के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांचे राजीनामे घेतले. रिक्त ठिकाणी अनुक्रमे रणजितसिंह पाटील व अर्चना पाटील यांना स्वीकृत करून घेतले. सहकार निवडणूक प्राधिकरणाची मान्यता घेऊन या नियुक्त्या करणे अपेक्षित होते; पण तसे न करता घाईगडबडीने नियुक्त्या केल्याने विभागीय सहनिबंधक कार्यालयाने त्यावर आक्षेप घेतला होता. याबाबत निवडणूक प्राधिकरणाकडे मार्गदर्शन मागविले होते. जिल्हा बॅँकेने रिक्त पदे भरण्याची राबविलेली प्रक्रिया ही सकृत्दर्शनी अयोग्य आहे. निबंधक कार्यालयाला याबाबत उचित कारवाईची सूचना डॉ. आनंद जोगदंड यांनी दिली आहे. विभागीय सहनिबंधक राजेंद्रकुमार दराडे यांनी अर्चना पाटील व रणजितसिंह पाटील यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे जिल्हा बॅँकेला कळविले आहे. त्यामुळे जिल्हा बॅँकेच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत दोन्ही संचालकांना सहभागी होण्यास अडचण निर्माण झाली आहे.
अर्चना पाटील, रणजितसिंह पाटील यांची नियुक्ती अवैध
By admin | Updated: April 6, 2016 00:54 IST