लोकमत न्यूज नेटवर्क
निपाणी : प्रतिनिधी : निपाणीत आश्रय योजनेतून २०५२ घरे मंजूर झाली असून या घरांसाठी ९०६ अर्ज आले आहेत. या सर्व अर्जांना मंजुरी मिळाली असून अद्याप ११४६ घरे बाकी आहेत. त्यामुळे ज्या बेघर नागरिकांना घर हवे आहे त्यांनी येत्या १० जूनअखेर सर्व कागदपत्रासहीत अर्ज करावेत, असे आवाहन नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी केले आहे. नगरपालिका कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आयुक्त महावीर बोरणवर, नगरसेवक विनायक वडे, संतोष सांगावकर, रवी कदम, विनोद बागडे, राजेश कोठडीया आदी उपस्थित होते.
ते म्हणाले की, निपाणी शहरात मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून जी २ मॉडेलची घरे मंजूर झाली आहेत. निपाणी शहरासाठी एकूण २०५२ घरे मंजूर झाली असून पट्टणकुडी व शिंदेनगर येथे याचे काम सुरू आहे. या घरासाठी शहरातून केवळ ९०६ अर्ज आले असून या सर्व अर्जांना मंजुरी देत बांधकाम सुरू आहे, पण अद्याप ११४६ घरे बाकी असून निपाणी शहरातील नागरिकांनी याचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन पुन्हा करण्यात आले आहे.
असा करा अर्ज
येत्या १० जूनअखेर ज्या नागरिकांना घर हवे आहे त्यांनी आपले रेशनकार्ड झेरॉक्स, आधारकार्ड झेरॉक्स, मतदान ओळखपत्र, जातीचा व उत्पनाचा दाखला, बँक पासबुक झेरॉक्स, दोन फोटो, २० रुपयेच बॉण्ड आदी कागदपत्रे व घराचा पहिला हप्ता सिंडिकेट बँक शाखा निपाणी येथे ०५०५२२५००१३६४७ या क्रमांकावर जमा करावा.