मुरगूड : काल, सोमवारी पाच ठिकाणी चोरी करून जवळपास नऊ लाखांचा ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्यांनी एस. टी. स्टँडमागील ज्ञानेश्वर कॉलनीतील शशिकांत बळिराम पाटील यांच्या बंगल्यातही चोरी केल्याचे आज, मंगळवारी सकाळी उघड झाले. साडेचार तोळे सोन्याच्या दागिन्यांसह ८० हजार रुपये रोख रकमेवर चोरांनी डल्ला मारला. चारचाकी गाडी नेण्याचाही चोरट्यांनी प्रयत्न केला. या चोऱ्यांमुळेच दरोडेखोरांनीच पोलिसांना आव्हान दिले आहे. मात्र, नागरिकांत कमालीची घबराट पसरली आहे.ज्ञानेश्वर कॉलनीत मुख्य रस्त्याच्या कडेलाच शशिकांत पाटील यांचा बंगला आहे. पाटील हे आपला मुलगा विनयसोबत राहतात. रक्षाबंधनसाठी विनय बहिणीकडे पुण्याला गेला होता, तर शशिकांत पाटील हे काल पट्टणकोडोली येथे गेले होते. त्यामुळे बंगल्याच्या दरवाजाला लोखंडी ग्रिल व संरक्षण भिंतीला असणारा दरवाजा, अशा तिन्ही ठिकाणी कुलपे लावली होतीे. आज, मंगळवारी वर्तमानपत्रातील मुरगूडमधील दरोड्याची बातमी वाचून शशिकांत पाटील यांनी आपले बंधू दिलीप पाटील यांना बंगल्याकडे जाऊन येण्यास सांगितले. दिलीप पाटील हे बंगल्याजवळ गेले असता त्यांना बंगल्याचे तिन्ही दरवाजे व्यवस्थित बंद दिसले; पण तिन्हींचीही कुलपे मात्र जाग्यावर नव्हती. त्यामुळे त्यांना शंका आली. त्यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलावून मुरगूड पोलिसांत वर्दी दिली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक एस. के. काटे यांच्यासह फौजदार विलास पाटील यांनी तत्काळ भेट दिली.हॉलमधील शोकेज चोरट्यांनी पूर्णपणे विस्कटले होते. बेडरूममधील तिजोरी फोडून सर्व साहित्य विस्कटून टाकले होते. त्याच तिजोरीतील चार तोळ्यांचे सोन्याचे गंठण आणि रोख ४० हजार रुपये चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले. शशिकांत पाटील व त्यांचा मुलगा विनय दुपारी १२ च्या सुमारास आल्यानंतर दोन लाखांहून अधिक मुद्देमाल चोरट्यांच्या हाती लागल्याचे स्पष्ट झाले.ज्ञानेश्वर कॉलनीमध्ये आतापर्यंत तीन ते चार वेळा चोरट्यांनी धाडसी प्रयत्न केले आहेत. याबाबत अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक काटे, फौजदार पाटील, आदी करत आहेत.(वार्ताहर)चोरांनी दही, दुधावर मारला तावशशिकांत पाटील यांच्या घरात बाथरूममध्ये जाऊन चोरांनी हात-पाय धुऊन, फ्रिजमधील दुधाचे आणि दह्याचे भांडे हॉलमध्ये आणून, ते फस्त करून भांडी तिथेच टाकून पोबारा केला आहे.चारचाकी गाडी नेण्याचा प्रयत्नपाटील यांची चारचाकी गाडी दारातच लावली होती. चोरट्यांनी तिजोरीतील गाडीची चावी आणून मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून गाडी नेण्याचा प्रयत्नही केला. शेवटी गाडी तेथेच सोडून गाडीच्या चाव्या दारात टाकून चोरट्यांनी पोबारा केला.तीन तोळे सोने वाचलेपाटील यांनी तीन तोळे सोन्याचा तोडा डबीसह ते झोपतात त्या बेडजवळ साध्या कापडी पिशवीमध्ये ठेवला होता; पण चोरट्यांनी तिजोरी फोडली. पण, त्या पिशवीकडे दुर्लक्ष केल्याने साधारणत: ९० हजार रुपयांचे सोने वाचले.
मुरगूडमध्ये आणखी एक बंगला फोडला
By admin | Updated: August 13, 2014 00:36 IST