कोल्हापूर : शहरातील फेरीवाल्यांच्या योग्य पुनर्वसनाबाबतीत त्यांच्याशी चर्चा करण्यास आपण केंव्हाही तयार आहे. बुधवारी त्यांना भेटण्यास येण्याची वेळ दिली होती, पण ते आले नाहीत, असे महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शहराच्या कोणत्याही प्रश्नावर चर्चा करण्याची माझी तयारी आहे. फेरीवाल्यांनाही मी वेळ दिली होती. त्यांची वाट पाहिली, पण ते आले नाहीत, असे सांगतानाच शनिवारी अशी कोणतीही बैठक घेणार असल्याचे आम्ही कोणाला सांगितले नाही किंवा अशी बैठक आयोजित करण्यात येत असल्याचे मला कोणी सांगितलेले नाही. जर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी निरोप दिलाच, तर आपण जाऊन चर्चा करणार असल्याचे बलकवडे यांनी स्पष्ट केले.
फेरीवाल्यांना अंबाबाई मंदिरापासून शंभर मीटर परिसरात व्यवसाय करता येणार नाही. त्यांना पर्यायी जागा देण्याकरिता रस्त्यावर पट्टे मारण्याचे काम अपूर्ण होते, म्हणून कारवाई केली नाही. पण पट्टे मारण्याचे काम झाल्यानंतर त्यांना तेथे जावेच लागेल, असे बलकवडे यांनी सांगितले.