गांधीनगर : गांधीनगर बाजारपेठेसह कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाअंतर्गत करवीर तालुक्यातील १४ गावांतील व्यापारी आस्थापना सरसकट सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी गांधीनगरचे माजी उपसरपंच राकेश उर्फ गुड्डू सचदेव व माजी ग्रामपंचायत सदस्य धीरज टेहलानी यांच्या नेतृत्वाखाली बंटी पाटील ग्रुप, जी.पी. ग्रुप व व्यापारी बांधवांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे केली.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यांपासून गांधीनगर बाजारपेठ बंद आहे. प्रशासनाकडे व्यापार सुरू करण्याबाबत वेळोवेळी निवेदने दिली आहेत. कोल्हापूर महापालिका क्षेत्र व कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण या दोन्ही क्षेत्रातील शासनाच्या अटी व नियम जवळपास समान आहेत. असे असतानाही फक्त कोल्हापूर महापालिका हद्दीतील सर्व दुकाने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तसे आदेश गांधीनगरसह परिसरातील व्यापारी आस्थापना सुरू करण्यासाठी ताबडतोब द्यावेत, अशी मागणी निवेदनात केली आहे. या मागणीचे निवेदन आमदार ऋतुराज पाटील यांनाही दिले. शिष्टमंडळात माजी पंचायत समिती सदस्य प्रताप चंदवानी, ग्रामपंचायत सदस्य गणेश देवकुळे, सनी चंदवाणी, गिरीश राजपूत यांचा सहभाग होता.
फोटो १० गांधीनगर निवेदन
गांधीनगर बाजारपेठ सुरू करण्यास परवानगी द्या, अशी मागणी व्यापाऱ्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.