कोल्हापूर : कोरोनास्थिती गंभीर होत असल्याने लॉकडाऊन कडक होत असताना यातून शेतीशी संबंधित सर्व बाबी वगळाव्यात. शेतीसेवा केंद्रांसह रस्त्याकडेला भाजीपाला विक्रीस मुभा देऊन शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेने जिल्हाधिकाऱ्यांकडे मंगळवारी निवेदनाद्वारे केली. सभेचे नेते प्रा. उदय नारकर यांनी ही माहिती दिली.
खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. पेरणीसाठी बी-बियाणे, खते, औषधे वगैरे शेतमाल वेळेवर उपलब्ध होणे आवश्यक आहे. ही सर्व कामे वेळेवर झाली नाहीत, तर हंगाम वाया जाऊन शेतकऱ्यांची अवस्था बिकट होईल, हे लक्षात घेऊन प्रशासनाने लाॅकडाऊन कडक केला तरी शेतकऱ्यांचा सहानुभूतिपूर्वक विचार करावा. बी-बियाणे, औषधे, खते आदी वस्तूंची दुकाने बंद ठेवल्यास शेतकऱ्यांचा हंगाम वाया जाण्याची भीती आहे. या वस्तूंचा पुरवठा सुरळी राहावा यासाठी किमान वेळ या वस्तूंची दुकाने खुली ठेवण्याची परवानगी द्यावी.
चौकट ०१
शेतकऱ्यांचे नुकसान टाळा
भाजीपाला विकला गेला नाही, तर तो नाशवंत माल असल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान होईल. जिल्ह्यातील शहरे हीच भाजीपाल्यासाठी मुख्य बाजारपेठ आहे. भाजी खरेदी करण्यासाठी मंडयांमध्ये झुंबड उडून शारीरिक अंतराचा फज्जा उडतो, हे मान्य आहे; पण स्वतः शेतकरी रस्त्याच्या कडेला बसून आपला भाजीपाला विकू शकतात. खुल्या जागेत शारीरिक अंतर पाळत विकेंद्रित पद्धतीने भाजीपाला विकणे शक्य आहे. एकाच वेळी ग्राहकाला भाजीपाला उपलब्ध होत उत्पादकाचेही नुकसान टाळता येईल.
चोकट ०२
मागण्या
खरीप हंगामासाठी शेतीमाल विक्रीची दुकाने खुली ठेवा.
ने-आण सुकर होण्यासाठी वाहतुकीला परवानगी द्या.
भाजीपाला विक्री रस्त्याच्या कडेला करण्यास परवानगी द्या.
सर्व भाजीविक्रेते, छोटे व्यापारी आणि शेतकऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करा.