कोल्हापूर जिल्हा १२ तालुक्यांचा; पण कोसा-कोसांवर भाषा बदलते, तशी जिल्ह्यात तालुका-तालुक्यांत माती, तिचा पोत आणि रंगही बदलतो. गगनबावड्यातील लालभडक माती शिरोळला कृष्णेच्या संगमाला मिळेपर्यंत काळी कसदार होऊन जाते. त्यामुळे जमिनीच्या पोतानुसार येथे पिकेही बदलतात. शिरोळमध्ये पिकणारा भाजीपाला गगनबावड्यात तसा पिकेल असे नाही, तर चंदगडच्या लाल मातीत पिकणारी रताळी हातकणंगलेत पिकतील असे नाही. आजऱ्यातील तांदळाचा सुगंध शिरोळमध्ये येणार नाही. एकूणच तालुकानिहाय बऱ्यापैकी पिकांची वैविधता येथे आहे. तरीदेखील आता ‘ग्लोबल टू लोकल’ म्हणत जगभरात पिकणारा भाजीपाला असू की फळं ते लावण्यासाठी कोल्हापूरचा शेतकरी धडपडत आहे. त्यातूनच मग गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळ्यात चहा, कॉफीचे मळे फुलू लागले आहेत, तर करवीर शिरोळमध्ये ड्रॅगन फ्रूट, थायलंडचा पेरूचा भाव खात आहे. झुकेनीसारख्या परदेशी भाषा करवीर, चंदगडच्या भूमीत पिकत आहेत. शिरोळमधील गुलाबासह फुलशेती जगभर सुगंध देते तर हातकणंगलेतील बिन मातीची, पाण्यावरची शेती जगाचे लक्ष वेधून घेते. शेवगा शेतीने शिवारे कात टाकू लागली आहेत.
शाहू महाराजांच्या दूरदृष्टीने बांधल्या गेलेल्या राधानगरी धरणामुळे पंचगंगा खोरे समृद्ध झाले. स्वातंत्र्यानंतरही शाहूंचा हाच वारसा इथल्या लोकप्रतिनिधींनी पुढे चालवल्याप्रमाणे काळम्मावाडी, वारणा, तुळशीसारखी मोठी धरणे बांधली गेली. त्याला जोडूनच लघू व मध्यम प्रकल्प उभारले गेले. सिंचनाचे विस्तृत जाळे विणले गेले. शेतकऱ्यांचे कष्ट आणि त्याला जोडीला पाटाला आलेल्या पाण्याने कोल्हापूरची माती मोहरून आली. आज तब्बल पावनेचार लाख हेक्टर क्षेत्र पिकाखाली आहे. त्यातही बारमाही पिकांचे प्रमाण जास्त आहे. येथे पाण्याची कमतरता नाही, पण तीन वर्षांच्या मागे अनियमित पावसाचा फटका बसल्याने पाणी बचतीबरोबरच जमिनीचे आरोग्य चांगले राहण्यासाठी ठिबककडे शेतकरी मोठ्या प्रमाणावर वळला. आज बऱ्यापैकी क्षेत्र ठिबकखाली आले आहे. करवीर तालुक्यातील कारभारवाडीसारखे अख्खे एक गावच शंभर टक्के ठिबक वापरणारे गाव ठरते, हे त्याहूनही विशेष. लोकप्रतिधी, कृषी अधिकारी व शेतकरी यांच्यातील समन्वय हाच इथल्या समृद्ध शेतीचा आत्मा आहे. शेतीवर भर देणारी धोरणे राबवली जात असल्याने, त्यावर आधारीतच अर्थकारणही असल्याने कोल्हापूरची शेती व शेतकरी खऱ्या अर्थाने राज्यात भारी तर आहेच, पण सर्व जिल्ह्यांना हेवा वाटावा असा देखील आहे.
उत्पादकतेतही कोल्हापूरच आघाडीवर
कोल्हापूर जिल्हा उत्पादकतेत राज्य आणि देशाच्याही सरासरीपेक्षा पुढे गेला आहे. स्वत:चाच उच्चांक मोडण्याची येथे स्पर्धा दिसते, त्यातून भात असो की सोयाबीन की, ऊस येथे लाखाच्या बक्षिसांच्या स्पर्धा लागतात. दीडशे टन एकरी ऊस पिकवणारा शेतकरी शिरोळमध्ये हमखास भेटणार. त्याच वेळी भाताचा स्वत:चाच सुळकूड पॅटर्न तयार करणारा शेतकरी कागल तालुक्यातच भेटणार.
रोपवाटिकांना बहर
रोपवाटिकाद्वारे शेती करता येते, हे दहा वर्षांपूर्वी सांगितल्यावर वेड्यात काढले जात होते; पण आज उसापासून ते दोडका, कलिंगडाच्या वेलीपर्यंत रोपे तयार करून अथवा विकत आणूनच लागवड केली जात आहे. रोपवाटिकानिर्मिती हा लाखो रुपये मिळवून देणारा मोठा व्यवसाय बनला आहे. याशिवाय बिन मातीची, पाण्यावर तरंगणारी शेतीचे प्रयोगदेखील होत आहे. हातकणंगलेतील शेतकऱ्याने पाण्यावर तरंगणारी शेती करून कोट्यवधी रुपये कसे कमावता येतात, हे दाखवून दिले आहे.
राज्यात सर्वाधिक पीक कर्ज
कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा तोही कोल्हापूरकरांनीच. इथले खातेदार शेतकरी सात लाख. ते दरवर्षी २६०० कोटी रुपयांच्या शेती कर्जाची उचल करतात आणि ती फेडतातही. कृषी संबंधित संस्थांचे सहकाराच्या माध्यमातून उभारलेल्या जाळ्यातून शेतमाल विक्रीसाठीची व्यवस्था आहेच. भाजीपाला पिकवून तो मुंबईसह देशातील इतर राज्यांत पाठवण्यासाठी शिरोळ तालुक्यात तर संस्थाच स्थापन केल्या आहेत. सरकारच्या मदतीने आणि शेतकऱ्यांनी स्वत:च्या कल्पकतेने हे साध्य केले आहे.
प्रक्रिया प्रकल्पांना चांगले दिवस
अलीकडे चांगली बाजारपेठ मिळाल्याने प्रक्रिया उद्याेगाला महत्त्व आले आहे. त्यामुळे हे प्रक्रिया युनिट उभारणीसाठी कृषी विभागाकडील योजनेचा लाभ घेणारे प्रस्ताव येण्याचेही प्रमाण वाढले आहे. राज्यातील एकूण प्रकल्प प्रस्तावापैकी ३० टक्के प्रस्ताव हे एकट्या कोल्हापुरातून गेले आहेत.
यंत्राचा वापर वाढला
कृषी यांत्रिकीकरण योजनेतही कोल्हापूरने नाशिकच्या बरोबरीने राज्यात आघाडी घेतली आहे. बैलांची मशागत कितीही चांगली असलीतरी त्याची जोपासना तितकीशी सोपी नसल्याने अलीकडे जिल्ह्यात यांत्रिक शेतीवर जास्त भर दिला जात आहे. त्यातूनच शेतातील रोप लागणीपासून ते भांगलण, कापणीपर्यंत यंत्राचा वापर वाढला आहे. गवत कापणीपासून ते ऊसतोडणी, भात कापणीपर्यंतची कामेही आता बऱ्यापैकी यंत्राने केली जात आहे. ट्रॅक्टरची संख्या तर इतकी वाढली आहे की, एका गावात गेले तर दहा तरी ट्रॅक्टर दिसणारच.
अल्पभूधारक, तरी लखपती
जिल्ह्यातील ९२ टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. म्हणजेच दोन एकरांपेक्षाही कमी क्षेत्र त्यांच्याकडे आहे, तरीदेखील उसासारख्या पिकाची लागवड करून तो दरवर्षी लखपती होतो. त्याला जोड भाजीपाला पिकांसह दुग्ध व्यवसायाची देऊन आर्थिक समृद्धीत आणखी भर टाकली आहे. दूध आणि उसाला चांगला दर मिळत असल्याने बऱ्यापैकी गावागावांत आता सुबत्ता नांदत असल्याचे घरांच्या बदललेल्या रुपड्यावरून दिसत आहे.
लेखक : ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, कोल्हापूर