दत्तवाड : गावातील कृषीविषयक कामे सोपी व्हावीत यासाठी शासनाने गावातच कृषी समिती स्थापण्याचे ठरवले असून त्याचे अध्यक्ष विद्यमान सरपंचांना देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना कृषीविषयक माहिती गावातच मिळणे सोपे जाणार आहे.
शासनाने नुकतेच प्रत्येक गावात कृषी समितीची स्थापना करण्यासंबंधी आदेश काढला आहे. ग्रामीण भागात कृषी व्यवसाय हाच मुख्य व्यवसाय असून या व्यवसायातील असणारी अनिश्चितता दूर करण्यासाठी व शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात येणार आहे.
यातील हवामानातील बदल, लहरी पर्जन्यमान, शेतीमालाच्या दरातील घसरण याविषयी समिती काम करणार आहे. त्यानुसार विद्यमान सरपंच या समितीचे अध्यक्ष असणार असून उपसरपंच, तीन ग्रामपंचायत सदस्य, तीन प्रगतशील शेतकरी, सेवा सोसायटीचे अध्यक्ष, कृषिपूरक व्यवसायाचे प्रतिनिधी, महिला बचत गटाचे प्रतिनिधी, तलाठी, कृषी साहाय्यक हे सदस्य असणार आहेत; तर ग्रामसेवक या समितीचे सचिव म्हणून काम पाहणार आहेत. नैसर्गिक आपत्तीबरोबरच शेतीविषयक विविध योजना, एकात्मिक कीड नियोजन यांसह योजनांविषयी समिती काम करणार आहे. महिन्यातून त्याची एक बैठक घ्यायची असून यावेळी तालुकास्तरीय अधिकारी बैठकीत उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
कोट - शेतकरीविषयी समिती स्थापन करण्यास आमचे सहकार्य राहील. आम्ही सदस्य म्हणून या समितीत काम करण्यास तयार आहोत. मात्र प्रत्येक गावात कृषी साहाय्यक असताना त्यांना समितीचे सचिवपद न देता ग्रामसेवकांना सचिवपद देणे चुकीचे आहे. आम्हाला ग्रामपंचायत इतर अधिक कामे असताना हे जादा काम देणे योग्य नाही. आम्ही गावसभेतील मासिक बैठकीमध्ये व कृषी समितीच्या बैठकीमध्ये काम करू; पण सचिव म्हणून आम्हास यातून वगळावे, अशी आम्ही मागणी केली आहे.
- एन. पी. निर्मळे, शिरोळ तालुकाध्यक्ष, ग्रामसेवक संघटना