दुर्वा दळवीकोल्हापूर: नियतीच्या मनात कधी काय असेल हे कोणीच सांगू शकत नाही. असंच काहीसं घडलं होतं कोल्हापूरच्या एका सुपुत्राबाबत जो देशसेवा बजावत असताना त्याचे आकस्मिक निधन झाले आणि त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला. परंतु हा दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही या वीर जवानाच्या पत्नीने दाखवलेली जिद्द, केलेली मेहनत ही आज अनेक महिलांना प्रेरणा देणारी अशीच ठरणार आहे. पतीच्या निधनानंतर वीरपत्नी प्रियांका खोत यांनी लेफ्टनंट पदाला गवसणी घातली.कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील तारदाळ गावातील जवान निलेश खोत यांचे सैन्य दलात सेवा बजावत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने २०२२ साली निधन झाले होते. शहीद जवान नीलेश यांच्या निधनानंतर खचून न जाता वीरपत्नी प्रियांका खोत यांनी नीलेश यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सैन्य दलात भरती होण्याचा निर्धार केला.खरंतर पतीच्या निधनानंतर पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळतो. पुढील आयुष्य कसे जगायचे हा मोठा प्रश्न तिच्यासमोर असतो परंतू, कोल्हापूरच्या मातीत जडणघडण झालेल्या प्रियांका यांनी देशसेवा करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला कुटुंबीयांनी ही पाठिंबा दिला. प्रियांका यांनी सैन्य दलात सेवा बजावण्यासाठी प्रयत्न करून ध्येय आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी सैन्य दलात प्रवेश मिळवला. प्रियांकांनी चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षण पूर्ण करून पासिंग आऊट परेडमध्ये सहभाग घेतला. प्रियांका यांची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंटपदी निवड करण्यात आली आहे. पतीच्या निधनानंतर खचून न जाता सैन्य दलात अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करून प्रियंका यांनी जिल्ह्याचे नाव देशपातळीवर उंचावले आहे. त्यांच्या या अभिमानास्पद कामगिरीनंतर त्या गावी परतल्यावर त्यांची गावकऱ्यांनी वाजतगाजत मिरवणूक काढत सत्कार केला. प्रियंका याच्या या कामगिरीमुळे गावकरीही भारावून गेले असून त्यांची मान ही अभिमानाने उंचावली आहे.शहीद जवान नीलेश खोत यांच्या निधनाने कुटुंबावर आलेला दुखद प्रसंग. याही परिस्थितीत वीरपत्नी प्रियांका यांनी मनाशी ठाम निश्चय करून सैन्य दलात अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. प्रियांका यांनी केलेल्या धाडसामुळे त्याचे आता सर्वत्र कौतुक होत आहे. लेफ्टनंट पदी निवड झालेल्या प्रियांका यांनी मिळवलेले हे यश केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरले आहे.
कोल्हापुरच्या लेकीची गगनभरारी! वीरपत्नी बनली भारतीय सैन्य दलाची अधिकारी -video
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 15:40 IST