कोल्हापूर : महानगरपालिका हद्दीत ‘डेल्टा प्लस’ विषाणूचे तीन रुग्ण आढळून आले. विशेष म्हणजे तीनही रुग्ण पूर्णत: बरे झाले असून उपचार घेऊन घरी परतले आहेत. तब्बल दीड महिन्यांनी त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्यामुळे महापालिका प्रशासनाने रुग्ण राहत असलेल्या भागात गेल्या दोन दिवसांपासून सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे.
एकीकडे कोरोना तसेच डेल्टा प्लस विषाणूपासून सावध रहा, खबरदारी घ्या म्हणून सांगितले जात असताना दुसरीकडे मात्र रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेल्यानंतर त्यांचे अहवाल ‘डेल्टा प्लस’ पॉझिटिव्ह येत आहेत. मग खबरदारी प्रशासनाने घ्यायचे की रुग्णांनी असा सवाल उपस्थित झाला आहे. रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांचे अहवाल डेल्टा प्लस पॉझिटिव्ह येतात हा आरोग्य प्रशासनाचा कारभार म्हणजे ‘वराती मागून घोडे’ असल्याची टीका होत आहे.
रविवारी सकाळी महानगरपालिका प्रशासनास शहरात तीन डेल्टा प्लस रुग्ण असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पालिका कर्मचाऱ्यांनी संबंधित तीन रुग्णांची घरे गाठली, तेव्हा ते ठणठणीत बरे असल्याचे आढळून आले. आरोग्य यंत्रणेने त्यांचा सर्व पूर्व तपशील तपासून पाहिला. सर्वेक्षण हाती घेतले आहे.
मोरे-माने नगर आरोग्य केंद्रांतर्गत सानेगुरुजी वसाहत परिसरातील एक ३७ वर्षीय महिलेने दि. ५ जुलै रोजी स्वॅब तपासणीला दिला होता, तो पुढे तीन दिवसांनी पॉझिटिव्ह आला. म्हणून तिला शिवाजी विद्यापीठातील ‘डीओटी’ मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. तिच्या संपर्कातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली. दोघांवर उपचार झाले, कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले.
राजोपाध्येनगरातील ४५ वर्षीय महिला दि. ८ जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. तिला सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिने लस घेतली होती. तिच्या संपर्कातील बारा व्यक्तींचे स्वॅब तपासले. तिचा मुलगा पॉझिटिव्ह आला. दोघांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. विचारेमाळ येथील ६५ पुरुषांच्या बाबतही असेच घडले. २ जुलै रोजी पॉझिटिव्ह असलेल्या या व्यक्तीवर सीपीआर रुग्णालयात उपचार झाले. त्यांच्या संपर्कातील दहा व्यक्तींची तपासणी करण्यात आली, तेव्हा त्यांचा मुलगा पॉझिटिव्ह आला. दोघांचीही तब्येत आता बरी आहे. या तिघांचे डेल्टा प्लस अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आले.
दीड महिन्यानी अहवाल...
शहरातील तीनही रुग्णांचे अहवाल तब्बल दीड महिन्यानी महापालिकेला मिळाले. जिल्हा आरोग्य प्रशासन प्रत्येक आठवड्याला पंचवीस रुग्णांचे स्वॅब ‘डेल्टा प्लस’ विषाणू तपासण्यासाठी घेतले जातात. ते दिल्ली येथील लॅबकडे पाठविले जातात. त्यामुळेच कोणी व्यक्ती पॉझिटिव्ह असले तर त्यांचे अहवाल उशिरा मिळत आहेत.