कोल्हापूर : तांबाळे (ता. भुदरगड) येथील इंदिरा गांधी भारतीय महिला सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक नेमा, यासह विविध मागण्यांसाठी आज, गुरुवारी शिवसेनेतर्फे लक्ष्मीपुरी येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.दुपारी बाराच्या सुमारास जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. यानंतर देवणे यांनी सहसंचालक वाय. व्ही. सुर्वे यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली व निवेदन सादर केले.इंदिरा गांधी महिला साखर कारखाना २०१३-१४ ऊस गळीत हंगामात भाडेतत्त्वावरील करार संपल्याने बंद होता. २०१३-१४ ऊस गळीत हंगामात कोल्हापूर जिल्हा शिवसेना व भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांतर्फे कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास द्यावा; अन्यथा प्रशासक नेमावा, अशी मागणी शिवसेनेने केली होती; परंतु साखर कारखाना सुरू झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. सन २०१४-१५ चा ऊस गळीत हंगाम सुरू झाला तरीही हा कारखाना सुरू झालेला नाही. त्यामुळे भुदरगड तालुक्यातील उसाचे नुकसान होत आहे. १९ डिसेंबर २०१४ रोजी साखर आयुक्त, पुणे यांनी हा कारखाना दीर्घ मुदतीने संयुक्त व्यवस्थापन तत्त्वावर चालविण्यास घेण्याकरिता ‘श्रीनिवास आदर्श वास्तू प्रा. लि.’ यांना चालविण्यास देण्याबाबतच्या प्रस्तावासंबंधी ३० नोव्हेंबर २०१४ पर्यंतची लायब्रेटिस तपासून स्टेटमेंटसह सद्य:स्थितीचा तक्ता व मिटकॉन या कन्सल्टन्सीकडून फायनान्शियल मॉडेल तयार करून घ्यावे, असे आदेश असतानाही आपल्या कार्यालयाने व इंदिरा गांधी कारखान्याने कोणतीही माहिती साखर आयुक्तांना दिलेली नाही. परिणामी, हा कारखाना रखडला आहे. म्हणून या कारखान्यावर प्रशासक नेमण्यात यावा. तसेच हा कारखाना चालविण्यास देताना करारपत्र पाच वर्षांचेच असावे, असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी सुर्वे यांनी आंदोलकांना लेखी पत्र दिले. त्यामध्ये त्यांनी या प्रश्नाबाबत साखर आयुक्तांना पाठवलेली अहवाल प्रत तसेच विशेष लेखापरीक्षक वर्ग १ (सहकारी संस्था, साखर) यांना या कारखान्याची ३० नोव्हेंबर २०१४ पर्यंतची दायित्वे तपासून स्टेटमेंटसह सद्य:स्थितीचा अहवाल दोन दिवसांत आपल्याला सादर करण्याचे पत्र आजच पाठविले आहे.आंदोलनात उपजिल्हाप्रमुख प्रवीणसिंह सावंत, प्रकाश पाटील, सुरेश पाटील, सुधीर राणे, रवींद्र बुजरे, अरविंद पाटील, दशरथ पाटील, धनाजी यादव, आकाश पाटील, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)
‘इंदिरा’ कारखान्यावर प्रशासक नेमा
By admin | Updated: January 2, 2015 00:59 IST