लोकमत न्यूज नेटवर्क
सुहास जाधव
पेठवडगाव : वडगाव शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत असून ५३७ कोरोनाबाधित असून १९ जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर ९०० अँटिजन टेस्ट करण्यात आल्या आहेत. तर २१ भागात प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहेत. अशा उपाययोजना नागरिकांच्या बेफिकीरीने निष्प्रभ ठरत असून रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे मुख्याधिकारीसाहेब ठोस अॅक्शन घेऊन रुग्णसंख्या आटोक्यात आणा, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.
शहरातील वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कृतिशील टास्क फोर्स तयार करण्याची गरज आहे. सध्या पालिकेचे नवनियुक्त मुख्याधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून कार्यभार वाहण्याऐवजी रस्त्यावर उतरून प्रशासनाला दिशा देण्याची गरज आहे.
सोमवारी बाजारपेठेत खरेदी आणि मोठ्या प्रमाणात फिरण्यासाठी गर्दी असते. यावर कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. मात्र याकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. या दिवशी झालेल्या बाजारहाटाने संसर्ग सुरू असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग समित्या फारशा सक्रिय नाहीत. त्यामुळे प्रभागात नेमके कोण काय करते, हेच कळेना झाले आहे. अनेकजण फॅमिली डॉक्टरच्या आधार घेत प्राथमिक उपचार घेत आहेत. यातून कौटुंबिक संसर्ग वाढला आहे.
पालिकेच्या वतीने शहरात ४५ वयोगटातील लसीकरण ७० टक्के पूर्ण झालेले आहे. त्यामुळे त्यांना प्राधान्य क्रम ठेवून उर्वरित आतील वयोगटातील नागरिकांची लसीकरण करण्याची आवश्यकता आहे. तर पालिका व पोलीस विनामास्क, विनापरवानगी व्यवसाय सुरू ठेवल्याबाबत कारवाईचा बडगा उगारत आहे. मात्र यात सातत्य नाही. अनेक ठिकाणी गर्दी आणि विनापरवाना व्यवहार सुरू असल्याचे चित्र आहे.
-------
फोटो कॅप्शन : पेठवडगाव : येथील सोमवारी अशी मुख्य बाजारपेठ असलेल्या पद्मा रोडवर अशी गर्दी झालेली असते.