कोल्हापूर : पूर्व परवानगी न घेता मुख्यालय सोडल्यास प्रशासकीय कारवाई केली जाईल, अशा इशाऱ्याचे पत्र जिल्हा परिषदेमधील सर्व खातेप्रमुख आणि गटविकास अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी शुक्रवारी दिले. यापूर्वी सूचना देऊनही अनेक वर्ग एकचे अधिकारी, चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी कोणतीही परवानगी न घेता मुख्यालयाबाहेर जात असल्याचे निदर्शनास आले आहे. मंत्रालय स्तरावरील आणि शासकीय बैठका, न्यायालयीन कामकाज, प्रशिक्षण, कार्यशाळेसह इतर कोणत्याही शासकीय कामकाजासाठी मुख्यालय सोडण्यापूर्वी जि. प. मधील सर्व खातेप्रमुख, गटविकास अधिकाऱ्यांनी माझी पूर्वपरवानगी घ्यावी. तातडीच्यावेळी मॅसेज किंवा मोबाईलवरून संपर्क साधून परवानगी घेतल्यास काहीही हरकत नाही. सुट्टीच्या दिवशी मंत्री, विभागीय आयुक्त तसेच इतर महत्त्वाच्या ऑनलाईन बैठकांना अधिकारी, कर्मचारी हजर नसतात हेही गंभीर आहे. यापुढील काळात असे प्रकार घडणार नाही, याकडे लक्ष द्यावे.
पूर्वपरवानगी न घेता मुख्यालय सोडल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:17 IST