कोल्हापूर : कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने केलेल्या कडक लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशीच सोमवारी मॉर्निंग वॉक करणाऱ्या तब्बल १७४ जणांना दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून त्यांच्याकडून सुमारे ७२ हजार ४०० रुपये दंड वसूल केला. त्याशिवाय तब्बल दीड हजार दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली.
कोरोनाचा वाढता संसर्ग व वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात आठवडाभर कडक लॉकडाऊन पुकारले आहे. लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी सोमवारीही दिवसभर पाऊस नसला तरीही बहुतांशी नागरिकांनी घरीच राहणे पसंद करून प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. त्यामुळे बहुतांशी रस्ते दुसऱ्या दिवशीही निर्मनुष्य राहिले. नागरिकांना रस्त्यावर येऊन रोखण्यासाठी कोल्हापूर शहरात कडक बंदोबस्त ठेवला होता. प्रत्येक चौकात वाहनांची तपासणी, फिरणाऱ्यांची विचारपूस करून कारवाई केली जात होती. लॉकडाऊनचे उल्लंघन करून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांच्या दुचाकी जप्तीचीही कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यात सोमवारी विनामास्क फिरणाऱ्या ४२० जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून १ लाख १२ हजार ७०० रुपये दंड वसूल केला. लॉकडाऊनमध्ये मॉर्निंग वॉकसाठीही पोलिसांनी प्रतिबंध केले आहेत; पण तरीही त्याची तमा न बाळगता सकाळी बाहेर पडलेल्या सुमारे १७४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. त्यांच्याकडून सुमारे ७२ हजार रुपये दंड वसूल केला. यामध्ये कोल्हापूर शहरातील ३२ जणांचा समावेश आहे.
लॉकडाऊनचे उल्लंघन करून विनाकारण फिरणाऱ्यांच्या सुमारे ३२० दुचाकी जप्त करण्यात आल्या. तर मोटर व्हेईकल ॲक्टनुसार ११३८ वाहनांवर गुन्हे नोंदवून त्यांच्याकडून १ लाख ६६ हजार ३०० रुपये दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देऊनही विनापरवाना सुरू ठेवल्याबद्दल ५३ आस्थापनांवर कारवाई करत त्यांच्याकडून ६८ हजार ७०० रुपये दंड वसूल केला.
पॉईंटर...
- विनामास्क कारवाई : ४२० (१,१२,७०० रुपये दंड)
- मो. व्हे, ॲक्ट. गुन्हे : ११३८ वाहने (१,६६,३०० रु. दंड)
- जप्त वाहने : ३२० वाहने
-आस्थापनांवर गुन्हे : ५३ (६८,७०० रु. दंड)
फोटो नं. १७०५२०२१-कोल-पोलीस०१
ओळ : कडक लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी कोल्हापूर शहरातही वाहनांची कसून तपासणी केली. ताराराणी चौकात पोलिसांनी वाहनांची अडवणूक करून त्यांची चौकशी केली जात होती. (छाया: आदित्य वेल्हाळ)
===Photopath===
170521\17kol_13_17052021_5.jpg
===Caption===
ओळ : कडक लॉकडाऊनच्या दुसर्या दिवशी सोमवारी कोल्हापूर शहरातही वाहनांची कसून तपासणी केली. ताराराणी चौकात पोलिसांनी वाहनांची आडवणूक करुन त्यांची चौकशी केली जात होती. (छाया: आदित्य वेल्हाळ)