अनिल पाटीलमुरगूड : यमगे मुरगूड दरम्यान रस्त्यावरच ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीमध्येच एका महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. ऊसतोड करणारी महिला निपाणीकडून गारगोटीकडे जाताना ही घटना घडली. यमगे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्याने बाळ बाळंतिणीचा जीव धोक्यातून बाहेर आला. गेले कित्येक दिवस यमगे मुरगूड दरम्यानचा रस्ता प्रचंड खराब झाला आहे. हा खराब रस्ता या माय-लेकांच्या जीवावर उठला होता. आता तरी प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.रयत साखर कारखान्याची ऊस वाहतूक करणारी टोळी निपाणी परिसरात कार्यरत होती.या टोळीतील अन्य लोक गारगोटी येथे आहेत. त्यांच्याकडे या टोळीतील कामगार शनिवारी सकाळी जात होते.त्यामध्ये एक गरोदर माताही होती. हे सर्वजण ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमधून प्रवास करत होते. यमगेच्या पुढे आल्यानंतर रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्याने त्या महिलेला जोरात कळा सुरू झाल्या. दरम्यान, त्या महिलेची रस्त्यावर ट्रॉलीमध्ये प्रसूती झाली. कोणत्याही सुविधा नसल्याने टोळीतील लोकांनी बाळाची नाळ खुरप्याने कापली होती. त्यामुळे प्रचंड रक्तस्त्राव होत होता. बाळ आणि आईच्या जीवाला धोका पोहचू शकला असता.रस्त्यावरून जाणाऱ्या संदीप पाटील या युवकाने या घटनेचा कानोसा घेऊन यमगे येथील प्राथमिक केंद्रातील आशासेविका सरिता धनाजी एकल यांना ही घटना सांगितली. काही वेळात डॉ. रुपाली लोकरे, आशासेविका सरिता एकल, सुनीता पाटील, सुनीता कांबळे यांनी धाव घेऊन उपचार केले आणि त्यांना रुग्णवाहिकेतून तत्काळ मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. सध्या या दोघांवर येथे अधिक उपचार सुरू असून बाळ आणि आई सुरक्षित असल्याचे डॉ. अमोल पाटील यांनी सांगितले.
Kolhapur News: रस्त्यावरच महिलेने दिला बाळाला जन्म, खुरप्याने कापली नाळ; खराब रस्त्यामुळेच बाळ-बाळंतीण धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 12:42 IST