कोल्हापूर : डाेळ्याच्या खालच्या पापणीला कॅन्सर झालेल्या ९७ वर्षीय आजींचा दृष्टिदोष दूर करण्यात ॲस्टर आधारमधील डॉक्टरांना यश आले आहे.
या आजींच्या डाव्या डोळ्याच्या पापणीखाली एक गाठ होती. परंतु तिचा त्रास नसल्याने त्याकडे दुर्लक्ष झाले. नंतर ही गाठ मोठी झाली आणि स्पर्श झाल्यानंतर त्यातून रक्त येऊ लागले. आजींचे वय आणि रोगाचे स्वरूप पाहून फिजिशिअन, हृदयरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ यांच्या टीमने त्यांची पूर्ण तपासणी केली. ॲस्टर आधारच्या नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. आदिती वाटवे यांनी संपूर्ण सर्जरीची त्यांना माहिती दिली. यानंतर पापणी काढून बायोप्सी करण्यात आली.
दुसरी सर्जरी न करता दोन टप्प्यात पापणीची पुनर्निर्मिती करण्यात आली. शस्त्रक्रियेवेळी कोणतीही गुंतागुंत होऊ नये यासाठी इतर विशेषज्ञही यावेळी उपस्थित ठेवण्यात आले. अमेरिकेत आणि भारतातही घेतलेल्या अनुभवाचा डॉ. आदिती वाटवे यांना फायदा झाला. त्या म्हणाल्या, डोळ्याचे रोग वेळीच ओळखून उपचार केले तर हाेणारी गुंतागुंत टाळता येते. सर्व तज्ज्ञ डॉक्टर आणि आधुनिक तंत्रज्ञान यामुळे हे शक्य झाले.