लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईला सन एप्रिल २०१९-मार्च २०२० या कालावधीत ७१ लाखांचे सोन्या-चांदीचे अलंकार अर्पण झाले आहेत. यात सोन्याच्या अलंकारांचे वजन १ हजार ९०९.९६० तर चांदीचे वजन १८ हजार २२९.२५५ इतके आहे. यासह जोतिबा देवस्थानलाही १२ लाखांचे दागिने अर्पण झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने या अलंकारांचे मूल्यांकन करण्यात आले.
करवीर निवासिनी श्री अंबाबाईला भक्तांनी अर्पण केलेल्या अलंकारांचे दरवर्षी मूल्यांकन केले जाते. मात्र, २०२० सुरू झाले ते कोरोनोचे संकट घेऊनच. मार्चपासून लाॅकडाऊन सुरू झाले. आणि देवस्थान समितीकडून दरवर्षी केले जाणारे मूल्यांकनही थांबले. आता मात्र कोरोनाच कहर थांबल्याने समितीतर्फे सुरू असलेल्या विकासकामांनाही गती आली आहे. याअंतर्गत गेल्या सहा सात दिवसांपासून अंबाबाईला तसेच वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबा देवस्थानला अर्पण झालेल्या सोन्या-चांदीच्या अलंकारांचे मूल्यांकन सुरू होते. ही मूल्यांकन प्रक्रिया मंगळवारी सायंकाळी पूर्ण झाली.
अंबाबाईला एका वर्षात आलेल्या सोन्या-चांदीच्या अलंकारांची किंमत ७१ लाख ६९ हजार ६७१ इतकी आहे. तर जोतिबाच्या अलंकारांची किंमत १२ लाख ६ हजार ४२७ इतकी आहे. अंबाबाईच्या अलंकारांमध्ये मूळ मूर्ती व उत्सवमूर्तीला वाहण्यात आलेली लहान-मोठी सोन्याची ठुशी, मंगळसूत्र, नथ, जोडवी, हार अशा अलंकारांचा समावेश आहे.
--
अलंकारांचे वजन आणि मूल्य असे
देवस्थान सोने-वजन (ग्रॅममध्ये) किंमत चांदी वजन (ग्रॅममध्ये) किंमत
१ श्री अंबाबाई मंदिर १ हजार ९०९.९६० : ६४ लाख ४९ हजार ६१६ : १८ हजार २२९.२५५ : ७ लाख २० हजार ०५५.५७
२ श्री जोतिबा मंदिर २७६.४७० : ९ लाख २० हजार ६४५.१० : ७ हजार ७५२.८०० : २ लाख ८५हजार ७८२.५०
एकूण २ हजार १८६.४३० : ७३ लाख ७० हजार २६१.९० २५ हजार ९८२.०५५ १० लाख ५ हजार ८३८.०७
-----
इंदुमती गणेश