‘बीपीएड’ची ६०, ‘एमपीएड’ची ७५ हजारांत डिग्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 03:25 AM2020-08-14T03:25:44+5:302020-08-14T03:25:52+5:30

युवक नांदेडचा? : शिवाजी विद्यापीठाची संबंधित युवकाविरोधात पोलिसांमध्ये तक्रार

60 degrees of ‘BPED’, 75,000 degrees of ‘MPED’! | ‘बीपीएड’ची ६०, ‘एमपीएड’ची ७५ हजारांत डिग्री!

‘बीपीएड’ची ६०, ‘एमपीएड’ची ७५ हजारांत डिग्री!

googlenewsNext

कोल्हापूर : बीपीएड, एमपीएड अभ्यासक्रमाच्या सन २०११ ते या वर्षापर्यंतच्या डिग्री (पदव्या) उपलब्ध आहेत. त्यांतील बी.पी.एड.ची डिग्री ६० हजार, तर एम.पी.एड.ची डिग्री ७५ हजार रुपयांत मिळेल. त्यासाठी संपर्क साधा, असे आवाहन नांदेडमधील असल्याचे सांगणाऱ्या एका युवकाने फेसबुकद्वारे केले आहे. त्याबाबत सोशल मीडियावरून प्रसारित झालेल्या संदेशात शिवाजी विद्यापीठाचा थेट उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यापीठाने याबाबत पोलिसांमध्ये तक्रार केली आहे, असे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी सांगितले.

फेसबुकवरील हा संदेश गेल्या काही दिवसांपासून अन्य सोशल मीडियावरून प्रसारित झाला आहे. त्यामध्ये सन २०११ पासूनच्या कालावधीतील बीपीएड, एम.पी.एड. डिग्री उपलब्ध आहेत. त्या देण्याचे काम ६० दिवसांमध्ये पूर्ण केले जाईल. अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन संबंधित युवकाने केले आहे. विशेष म्हणजे या संदेशातील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यास ‘मी देत असल्याची डिग्री बनावट असल्या’चे त्याच्याकडून सांगण्यात येत आहे. हा संदेश मिळाल्यानंतर कोल्हापुरातील काही प्राध्यापक, विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी या युवकाशी दूरध्वनीवरून संपर्क साधला, त्यावेळी त्याने ‘माझ्या काही मित्रांची अडचण होती. त्यामुळे त्यांना मी अशी डुप्लिकेट डिग्री दिली आहे. तुम्हाला कशासाठी हवी आहे? तुम्हांला इंटरेस्ट असेल, तर कळवा,’ असे त्याने सांगितले आहे.

दिल्लीपर्यंत ‘कनेक्शन’
‘लोकमत’ने या संदेशाची माहिती परीक्षा मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. आर. व्ही. गुरव यांना दिल्यानंतर त्यांनी संबंधित युवकाशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. ‘देशातील कोणत्याही विद्यापीठाची बी.पी.एड., एम.पी.एड., नेट-सेट, पीएच.डी.ची डिग्री देऊ शकतो. त्याबाबत दिल्लीत कनेक्शन असून तेथील लोकांद्वारे काम होईल’, असे त्याने सांगितले.

Web Title: 60 degrees of ‘BPED’, 75,000 degrees of ‘MPED’!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.