वाहन खरेदीत तब्बल ५० टक्के घट

By Admin | Updated: May 10, 2016 02:24 IST2016-05-10T01:31:32+5:302016-05-10T02:24:07+5:30

अक्षय्यतृतीया खरेदी : बाजारात दुष्काळाचे सावट; सोने खरेदीचा मात्र जोर

50 percent reduction in vehicle purchases | वाहन खरेदीत तब्बल ५० टक्के घट

वाहन खरेदीत तब्बल ५० टक्के घट

कोल्हापूर : अक्षय्यतृतीयेनिमित्त होणाऱ्या खरेदीत यंदा आॅनलाईन खरेदीने जोर धरला. सराफांच्या संपामुळे गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त सोने खरेदीसाठी चुकल्याने यंदा अक्षयतृतीयेनिमित्त कोल्हापूरच्या बाजारपेठेत सोने खरेदीसाठी उधाण आले होते. सोमवारी दिवसभरात शहर आणि परिसरात सुमारे १२ कोटी रुपये उलाढाल सोने खरेदीवर झाल्याचे सराफ व्यावसायिकांतून सांगण्यात आले; पण दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत असल्याने त्याचा परिणाम वाहन खरेदीवर मोठ्या प्रमाणावर दिसून आला. वाहन खरेदीमध्ये मात्र यंदा कमालीची घट झाली. गतवर्षीपेक्षा यंदा उलाढालीत सुमारे पन्नास टक्के घट दिसून आली.
इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी बाजारपेठ सायंकाळनंतर फुलली होती. त्यामुळे शिवाजी रोड, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, भाऊसिंगजी रोड आदी ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी दुकानात गर्दी होती. विशेषत; एल.ई.डी., फ्रीज, वॉशिंग मशीन आदी वस्तू खरेदीकडे ग्राहकांचा मोठ्या प्रमाणावर ओढा होता. दुकानातच वस्तू खरेदीसाठी विविध बँकांनी कर्जाच्या विविध योजनाही ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या होत्या.
अक्षयतृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभकार्याचे फळ न संपणारे असे मिळते. अक्षयतृतीयेचा दिवस हा सोने खरेदीसाठी शुभ मानला जातो. गेल्या महिन्यातील गुढीपाडव्याचा शुभमुुहूर्त सोने खरेदी करण्यासाठी चुकल्याचा परिणाम यंदा अक्षयतृतीयेवर दिसून आला. सोन्याच्या किमतीत चढ-उतार होत असला तरीही सोने खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारपेठ फुलली होती. सराफ बाजारपेठेत काहींनी दुकानांना विद्युत रोषणाई करून सायंकाळी ग्राहकांना आकर्षण करण्याचाही प्रयत्न केला.

Web Title: 50 percent reduction in vehicle purchases