निपाणी : चिकोडी-सदलगा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निपाणीजवळील खडकलाट क्रॉसवरील साततोंडी लक्ष्मी मंदिराजवळ तसेच अन्य घटनेत दोन वाहनांसह ५० लाखांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई निपाणी ग्रामीण पोलिसांनी केली.सुरत येथून १५० बॉक्स साड्या असणारा ट्रक (एमएच ०४ डीके ७९२९) बंगलोरकडे जाणार होता. ट्रकचालक राकेश मुळगीचे मूळगाव धुळगणवाडी आहे. तो गावाकडे जाऊन बंगलोरला जाण्यासाठी धुळगणवाडीकडे ट्रकसह येत होता. तो गावाकडे असणाऱ्या चेकपोस्ट नाक्यावरील अधिकाऱ्यांनी ट्रकची चौकशी केली. मात्र, साड्यांबाबत योग्य कागदपत्रे व बिले नसल्याने ट्रक निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याने ताब्यात घेतला.निपाणीहून चिकोडीकडे सदाशिव बजंत्री व दोन साथीदार टाटा सुमो (केए २२ ए ९८२१) घेऊन जात होते. गाडीत १३ लाख १ हजार ३३ रुपये धर्मस्थळ अभिवृद्धी योजनेतील महिला स्व-साहाय्य संघाकडून जमा करून चिकोडीच्या कॉर्पोरेशन बॅँकेत जमा करण्यासाठी जात असल्याचे सांगण्यात आले; पण याबाबत योग्य कागदपत्रे नसल्याने सुमोसह चालकाला ताब्यात घेण्यात आले. संबंधित रकमेची कागदपत्रे हजर केल्यानंतर रक्कम परत देण्यात येणार असल्याचे पथकप्रमुख मनोहर पोतदार यांनी सांगितले. पीडीओ टी. एस. सुनील, ग्राम शाखाधिकारी एम. पी. लोहार, फौजदार संकपाळ, अबकारी खात्याचे चिकमठ, कोचरी यांनी ही कारवाई केली. (प्रतिनिधी)
३६ लाखांच्या साड्या, १३ लाखांची रोकड जप्त
By admin | Updated: August 7, 2014 01:03 IST