लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात चालू वर्षात विविध निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच, गेल्या वर्षभरात शासनाकडून नागरिकांना रक्षणासाठी सुमारे ३३० जणांना नवीन हत्यार बाळगण्याचे परवाने मिळाले. जिल्ह्यातील हत्यार परवानाधारकांची संख्या आता ७९९२ वर पोहोचली आहे. बारा बोअर बंदूक, पिस्टल, रिव्हॉल्व्हर आदी हत्यारांचा यामध्ये समावेश आहे.
रिव्हॉल्व्हर जवळ बाळगण्याची हौस, क्रेझ सध्या समाजात वाढत आहे. हत्यारांचा बहुतांशी गैरवापर निवडणुकीत होत आहे. विनापरवाना हत्यारेही आज गल्ली-बोळांतील गावगुंडांकडे आहेत. शेती संरक्षण, स्वसंरक्षण, खेळाडू, लष्कर अगर बँकांना हत्याराचे परवाने दिले आहेत. निवडणुका आल्या की सुरक्षारक्षक, खेळाडूवगळता कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या व्यक्ती अगर गुन्हे नोंद असणाऱ्या व्यक्तींकडील हत्यारे व परवाने तात्पुरते जमा केले जातात.
निवडणुकीत स्वेच्छेने हत्यारे जमा करणारे अधिक
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील २७ पोलीस ठाण्यांतर्गत सुमारे ११५० परवानाधारकांना हत्यारे जमा करण्याचे आदेश दिले. आतापर्यंत सुमारे ६०० जणांनी तात्पुरती हत्यारे जमा केली. गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत २८०० जणांनी हत्यारे तात्पुरती जमा केली होती, तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ७६६२ पैकी ११३५ जणांना हत्यारे जमा करण्याचे आदेश असताना, २७९५ जणांनी ते जमा केली होती.
राजकीय लोकांना हौसच न्यारी
विशेषत; स्वसंरक्षणासाठी हत्यार परवाना मिळवायचा अन् ते हत्यार कमरेला अडकवून मिरवायची हौस अलीकडच्या राजकीय लोकांना आली आहे. त्यामुळे हत्यार परवाना ही काहींची फॅशनच बनली आहे.
शांत डोके आवश्यक
हत्यार बाळगणारी व्यक्ती ही शांत स्वभावाची असावी. किरकोळ करणांवरून ज्या व्यक्तीचे स्वत:वरील नियंत्रण सुटते, अशा व्यक्तींनी परवाना हत्यार बाळगणे धोकादायक ठरू शकते.
कोल्हापूर शहरात नागरी हत्यार परवाने (पोलीस ठाणेनिहाय)
- लक्ष्मीपुरी - ८४
- जुना राजवाडा - २५६
- राजारामपुरी - २८८
- शाहूपुरी - ८०८
- जिल्ह्यात हत्यार परवाने एकूण : ७९९२
- ग्रामीण भागात परवाने : ६५५६
- शहरी भागात परवाने : १४३६