कोल्हापूर : शिवाजी पेठ येथील महाकाली तालीम भजनी मंडळास यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त शाहू स्टेडियम येथे २६ फेबु्रवारी ते ८ मार्चदरम्यान वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष विकास साळोखे यांनी पत्रकार परिषदेत दिली. साळोखे म्हणाले, यंदा मंडळाच्या स्थापनेस ७५ वर्षे होत आहेत. यानिमित्त वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये फुटबॉल स्पर्धाही भरविण्यात येत आहे. या स्पर्धा शाहू स्टेडियम येथे गुरुवारपासून भरविण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या संघास ७५ हजार रुपये रोख व ट्रॉफी व उपविजेत्या संघास ५१ हजार रुपये रोख व ट्रॉफी असे बक्षीस देण्यात येणार आहे. याशिवाय ‘उत्कृष्ट फॉरवर्ड’, ‘हाफ’,‘ डिफेन्स’, ‘गोलकिपर’ या खेळाडूंना रोख रकमेसह सोन्याचे फुटबॉलच्या आकारातील लॉकेट बक्षीस देण्यात येणार आहे. यावेळी गिरीष भोसले, भानुदास इंगवले, प्रकाश सरनाईक, पप्पू नलवडे, सचिन साठे, तुकाराम साळोखे, मदन साठे, श्रीकांत फडतारे, किशोर साठे, आदी प्रमुख नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कोल्हापुरात २६ पासून ‘महाकाली’ फुटबॉल स्पर्धा
By admin | Updated: February 23, 2015 00:36 IST