* दररोज तीन मेट्रिक टन ऑक्सिजन हवेतून गोळा करणार
* कोविड सेंटर व ग्रामीण रुग्णालयाला दिली भेट
आजरा : आजरा ग्रामीण रुग्णालयात २५ ऑक्सिजन बेड व ऑक्सिजन प्लांट तातडीने उभारणी करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. २५ लाखांच्या ऑक्सिजन प्लांटमध्ये दररोज तीन मेट्रिक टन ऑक्सिजन हवेतून गोळा केला जाणार आहे.
आजऱ्यातील कोरोना सेंटर व ऑक्सिजन प्लांट उभारणी संदर्भातील जागेची पाहणी करताना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ही माहिती दिली. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोरोना सेंटरला भेट देऊन रुग्णांना ऑक्सिजन व्यवस्थित मिळतो का, रिझर्व्ह ऑक्सिजन आहे का, रुग्णांवर वेळेवर उपचार होतात का याबाबत माहिती घेतली.
रोझरी हायस्कूलच्या विद्यार्थी वसतिगृहात नव्याने सुरू केलेल्या कोविड सेंटरलाही जिल्हाधिकारी देसाई यांनी भेट दिली. प्रशासनातील अधिकारी व खासगी डॉक्टर यांनी सुरू केलेल्या या कोविड सेंटर व रुग्णांवरील उपचाराबद्दल समाधान व्यक्त केले.
ग्रामीण रुग्णालय आजरा येथे २५ ऑक्सिजन बेड तातडीने सुरू करावेत असे आदेश दिले. हॉस्पिटलच्या मागील बाजूस व बायोमेडिकल वेस्टेजच्या शेजारी ऑक्सिजन प्लांट उभारणी केली जावी असेही त्यांनी सांगितले.
आजरा तालुक्यातील रुग्णांवर तातडीने उपचार करून मृत्युदर कमी करा, लॉकडाऊन हा कडक केला जावा, लोकांना घराबाहेर पडू देऊ नका, पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांना तातडीने उपचार करून त्यांचे स्वॅब घ्या, रुग्णांना ऑक्सिजन कमी पडू देऊ नका, असेही आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी यावेळी केले.
यावेळी प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, तहसीलदार विकास अहिर, नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी-पाटील, गटविकास अधिकारी बी. डी. वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. यशवंत सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय देशमुख, डॉ. वृषाली केळकर, मुख्याधिकारी अजिंक्य पाटील यासह कर्मचारी उपस्थित होते.
------------------------
फोटो ओळी : आजरा ग्रामीण रुग्णालयाजवळ ऑक्सिजन प्लांटच्या जागेची पाहणी करताना जिल्हाधिकारी दौलत देसाई. शेजारी डॉ. संपत खिलारी, विकास अहिर, डॉ. यशवंत सोनवणे, बी. डी. वाघ, वृषाली केळकर, आदी उपस्थित होते.
क्रमांक : १९०५२०२१-गड-०१