इचलकरंजीत २२ तास मिरवणूक

By admin | Published: September 16, 2016 11:17 PM2016-09-16T23:17:04+5:302016-09-16T23:43:07+5:30

गणेश विसर्जन : प्रथमच डॉल्बीविरहित मिरवणूक; नागरिकांतून समाधान

22-hour procession in Ichalkaranji | इचलकरंजीत २२ तास मिरवणूक

इचलकरंजीत २२ तास मिरवणूक

Next

इचलकरंजी : येथील गणेश विसर्जनाची मिरवणूक तब्बल २२ तास चालली असली तरी यंदा मिरवणुकीमध्ये डॉल्बी वाजली नाही, हे एक वेगळेपण ठरले. त्यामुळे झांज पथक, बेंजो, लेझीम पथक, ढोल-ताशे, अशा पारंपरिक वाद्यांच्या निनादामध्ये आणि गणेश भक्तांच्या उत्साहात ‘श्रीं’ची विसर्जन मिरवणूक पार पडली. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता मिरवणुकीची सांगता झाली. पंचगंगा नदीमध्ये ५१९ सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींचे, तर शहापूर येथील खणीत ९८ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास शिवाजी पुतळा चौक येथे मानाच्या बिरदेव गणेशोत्सव मंडळाच्या पालखीतील गणेशमूर्तीचे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हाधिकारी अमित सैनी, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, आदींच्या हस्ते पूजन झाले. यावेळी उपनगराध्यक्ष महावीर जैन, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिनेश बारी, उपअधीक्षक विनायक नरळे, पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, सतीश पवार, मनोहर रानमाळे, अरुण पवार, आदींची उपस्थिती होती. बिरदेव गणेशोत्सव मंडळाची पालखी काही अंतर वाहून नेल्यानंतर विसर्जन मिरवणूक सुरू झाली.
सार्वजनिक गणेश मंडळांबरोबरच काही घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन पंचगंगा नदीघाट व शहापूर खण येथे सुरू झाले होते. गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीत अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस दल व गृहरक्षक दलाच्या जवानांनी चोख व्यवस्था ठेवली होती. सकाळपासूनच पारंपरिक वाद्यांचा गजर करीत बहुतांशी गणेशोत्सव मंडळांनी आपापल्या गणेशमूर्ती विसर्जनास सुरुवात केली होती. त्यामध्ये मंगळवार पेठ-चांदीचा गणपती, गांधी कॅम्प युवक मंडळ, यशवंत कॉलनी, राणाप्रताप गणेशोत्सव मंडळ, नवरत्न टायगर, यशवंत कॉलनी, लक्ष्मी प्रोसेसर्स, संतुबाई मंडळ, जमीर ग्रुप, मित्रोदय, अवधूत, रसना कॉर्नर, शिवशक्ती, खंजिरे मळा, सरस्वती मार्केट, नवजवान कला व सांस्कृतिक मंडळ, कबनूर मानाचा गणपती, अशा गणेशोत्सव मंडळांचा समावेश होता.
पोलिसांची नजर चुकवून भोनेमाळ, थोरात चौक, गावभाग अशा परिसरातील काही गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी डॉल्बी लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांच्यावर त्यांची मिरवणूक सुरू होण्यापूर्वीच कारवाई केल्याने डॉल्बीचा होणारा दणदणाट थांबला. झेंडा चौक गणेशोत्सव मंडळ व एस. टी. ग्रुप या मंडळांनी आपल्या मिरवणुकीमध्ये लेसर शोचे आयोजन केले होते. त्यांचा हा शो मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. तसेच युवा वायू मंडळाने सादर केलेले मर्दानी खेळ, खंजिरे मळ्यातील महिलांनी ढोल-ताशांच्या तालावर धरलेला फेर व केटकाळे गणेशोत्सव मंडळाचे श्रवणबेळगोळ येथील श्री बाहुबली वध्य गोष्टी हे वाद्य लक्ष वेधून घेत होते. गणेशोत्सव मंडळांच्या प्रमुखांना शहरातील राजकीय पक्ष, संघटनांनी मानाचा विडा दिला. (प्रतिनिधी)


आजऱ्यात आकर्षक दहा तास मिरवणूक

मलकापुरात शांततेत गणेश विसर्जन

‘गडहिंग्लज’करांचा ‘डॉल्बी’ला बाय-बाय
तब्बल १७ तास मिरवणुका : भजन, लेझीम, बेंजो, ढोल-ताशांचा गजर

पेठवडगावात गणेश विसर्जन : लेझीम, ढोल-ताशा, हलगी-घुमके पारंपरिक वाद्यांचा गजर

Web Title: 22-hour procession in Ichalkaranji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.