कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधक लस मर्यादित स्वरूपात येत असताना उपलब्ध लसींमधील अधिकाधिक लसींचा वापर करून सुमारे १३ हजार जादा लाभार्थींचे लसीकरण करण्याची कामगिरी कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी बजावली आहे.
जिल्ह्यात ३० एप्रिल २०२१ पर्यंत एकूण ९५ हजार १६५ कोरोना लसींच्या व्हायल, कुप्या प्राप्त झाल्या आहेत. त्यातील ९२ हजार ४७३ व्हायल वापरण्यात आल्या. एका व्हायलमध्ये १० जणांचे लसीकरण करण्यात येते. वापरलेल्या ९२ हजार ४७३ व्हायलनुसार जिल्ह्यात ९ लाख २४ हजार ७३० लाभार्थींचे लसीकरण होणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात जिल्ह्यात ९ लाख ३७ हजार ६४३ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी दर्जेदार सेवा दिल्यामुळेच तब्बल १२ हजार ९१३ जादा लाभार्थींचे लसीकरण करण्यात आले आहे.
चौकट
उर्वरित लसींचाही वापर
एका व्हायलमध्ये ५ मिली लस असते. त्यामध्ये प्रत्येकाला ०.५ मिलीप्रमाणे १० जणांचे लसीकरण केले जात आहे. मात्र, अनेक व्हायलमध्ये १० जणांचे लसीकरण झाल्यानंतर सुद्धा काही प्रमाणात लस शिल्लक राहते. त्यामुळे एकूण व्हायलच्या माध्यमातून जादा लाभार्थींचे लसीकरण केले जात आहे. विशेष म्हणजे एक व्हायल फोडल्यानंतर पुढच्या ४ तासांच्या आत त्यातील लस संपवणे बंधनकारक आहे. ४ तासांपेक्षा जास्त वेळ झाल्यास लस खराब होते. याबाबतही कर्मचाऱ्यांनी दक्षता घेतली आहे.
चौकट
माणगाव ग्रामपंचायतीने करून दाखवले
हातकणंगले तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या लसीकरण शिबिरामध्ये १५ व्हायल उपलब्ध झाल्या होत्या. त्यामध्ये १५० जणांचे लसीकरण होणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात १६५ जणांचे लसीकरण झाले. म्हणजेच एका व्हायलमध्ये ११ जणांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती सरपंच राजू मगदूम यांनी दिली.
काेट
सुरुवातीच्या काळात जिल्ह्यात अल्प प्रमाणात लस वाया जात होती. मात्र, नंतर याबाबत प्रशिक्षण घेतल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांनी अतिशय काटेकोरपणे लसीकरणास सुरुवात केली. त्यामुळेच उपलब्ध लसींमध्ये अपेक्षेपेक्षा १२ हजार ९१३ जादा नागरिकांना लस देण्यात आली आहे.
डॉ. फारूक देसाई
समन्वय अधिकारी, लसीकरण मोहीम