कोल्हापूर : करवीर तालुक्यातील निगवे दुमाला गावाने पाच ट्रक भरून दहा हजार शेणी महापालिकेच्या स्मशानभूमीसाठी दिल्या. गावकऱ्यांतर्फे रविवारी सकाळी पंचगंगा स्मशानभूमी येथे महापालिका उपायुक्त रविकांत आडसूळ व मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांनी या शेणींचा स्वीकार केला.
महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमी, बापट कॅम्प, कसबा बावडा तसेच कदमवाडी येथे मृतदेहांवर महापालिकेच्यावतीने मोफत अंत्यविधी करण्यात येतो. सध्या कोविडचा प्रादुर्भाव वाढल्याने मृत्यूंच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाबाधितांची मृत्यूसंख्या वाढत असल्याने त्यांच्यावर कराव्या लागणाऱ्या अंत्यविधीसाठी शेणी व लाकूड भविष्यात कमी पडू नये म्हणून स्मशानभूमीस शेणी दान करण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले होते. या आवाहनास प्रतिसाद देऊन निगवे दुमाला गावकऱ्यांनी या शेणी भेट दिल्या.
यावेळी उपसरपंच धनाजी पाटील, माजी सरपंच सुरेश पाटील, तंटामुक्ती उपाध्यक्ष रणजित पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राजाराम कासार, पोलीस पाटील शिवाजी सुतार, सर्जेराव पाटील, संजय पाटील, अर्जुन पाटील, आदित्य कराडे, संजय एकशिंगे, उत्तम चौगले, अजिंक्य माळी, सुशांत जासूद, गोपी एकशिंगे, बंडोपंत जासूद, सनी पाटील, अर्जुन रावळ उपस्थित होते.
फोटो क्रमांक - ०९०५२०२१-कोल-केएमसी
ओळ - कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीस रविवारी करवीर तालुक्यातील निगवे दुमाला ग्रामस्थांनी दहा हजार शेणी दिल्या. उपायुक्त रविकांत आडसुळ यांनी त्याचा स्वीकार केला.